राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त; टास्क फोर्सची होणार बैठक
कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही त्यांनी निर्देश त्यांनी दिले आहेत.
सोमवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला आठ लाख डोसेस देत होतो, सद्या पाच लाख डोसेस दिवसाला दिले जात आहेत.
करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
विवाहसोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामाशाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नाताळ, नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे. नवे निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र बाहेर पडता येणार नाही वा एकत्र जमता येणार नाही.
0 Comments