नर्मदा पुराण कथा, गोसेवा, तुलादान, ब्राह्मण भोजनासह 'नानीबाई का मायरा' कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मंगरूळपीर सुधाकर चौधरी, — पवित्र अधिक मासानिमित्त वाशिम जिल्हा माहेश्वरी महिला संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विविध धार्मिक, सामाजिक व सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. धर्म, सेवा आणि संस्कार या मूल्यांचा जागर करत राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
संघटनेतर्फे १ ते ७ जून २०२६ या कालावधीत आयोजित श्री नर्मदा पुराण कथा कार्यक्रमात दररोज सुमारे १५० भाविकांनी उपस्थित राहून कथाश्रवणाचा लाभ घेतला. कार्यक्रमादरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली.
अधिक मासानिमित्त जिल्ह्यातील सर्व तहसील स्तरावर गोसेवा व तुलादान कार्यक्रम आयोजित करण्यात आले. जैविक भाज्यांपासून तयार करण्यात आलेल्या गोमाता केकचे पूजन करून प्रतीकात्मक केक कापण्यात आला. या माध्यमातून गोमातेप्रती कृतज्ञता, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
तसेच तुलादान महोत्सवात ठाकूरजींचे तुलादान करण्यात आले. पुण्यप्राप्तीच्या उद्देशाने ३३ ब्राह्मणांना सन्मानपूर्वक भोजन देण्यात आले. अधिक मासाच्या निमित्ताने दान, सेवा आणि धर्मकार्याशी संबंधित विविध उपक्रमही मोठ्या उत्साहात राबविण्यात आले.
अधिक मासाची सांगता अमावास्येच्या पर्वावर अनसिंग येथे आयोजित 'नानीबाई का मायरा' या त्रिदिवसीय धार्मिक कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
धर्म, सेवा, संस्कार आणि समाजहिताची परंपरा जोपासत वाशिम जिल्हा माहेश्वरी महिला संघटना समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे संघटनेच्या अध्यक्षा सौ. रेणुका हूरकट यांनी सांगितले. या सर्व उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सचिवा सौ. माधुरी राठी यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मोलाचे योगदान लाभल्याचे त्यांनी नमूद केले.
— प्रतिनिधी
0 Comments