वाशिम - नागपूर महानगर पालिकेचे माजी महापौर संदीप जोशी यांनी ट्विटरवरुन चर्मकार समाज बांधवाच्या व खाटीक समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने केली आहे. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी समाज कल्याणमंत्री मा.श्री. बबनरावजी घोलप साहेब यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वाशिम जिल्हाध्यक्ष समाधान माने यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शक तथा माजी आमदार पुरुषोत्तमजी राजगुरु,महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव सौ. सीमाताई राजगुरु, विदर्भ कार्याध्यक्ष डॉ. दिपक ढोके,जिल्हा सचिव संतोष आमले, जिल्हा उपाध्यक्ष राजेश वजीरे, कर्मचारी आघाडीचे अध्यक्ष देवानंद राजगुरु, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर पद्मने, सुरेश थोटे इत्यादीच्या प्रमुख उपस्थितीत १० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
खासदार संजय राऊत यांच्या मुख्यमंत्र्याच्या प्रत्यक्ष दर्शनाने महाराष्ट्रात उत्साह या पोस्टला टॅग करत नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर संदीप जोशी यांनी आत्ताच तुमची पोस्ट वाचली, अती सुंदर पोस्ट आहे. मी आमच्या रेड्याला ही पोस्ट वाचवून दाखविली तर त्याने तब्बल साडे आठ लिटर दूध दिलं. नंतर मी आमच्या सरपंचाला तुमची पोस्ट वाचून दाखविली तर सरपंचाचं वीस वर्ष जुनं मुळव्याध गळून पडलं. आमच्या सरकारी दवाखान्याच्या कंपाउंडरने ही पोस्ट वाचवून दाखवली तर त्याची मेलेली बकरी पुन्हा जिवंत झाली. आमच्या सद्या न्हाव्याने सकाळी टमाट्याच्या शेतात असताना ही पोस्ट वाचली तर त्या शेतात सद्याने पाणी टाकून काम आटोपल्याबरोबर टमाट्याच्या झाडाला हापूसचे आंबे लागले. नंतर तुमची पोस्ट आमच्या महादू चांभाराने वाचली तर महादूच्या गावठी कुत्रीला पंचवीस डॉबरमॅनची पिल्ल झाली. तुमच्या पोस्टमुळे आमच्या गावातल्या कोरड्याठक नदीला अचानक पूर आला आणि गावातल्या सगळ्या कोरड्याठक विहिरीत काठोकाठ बिस्लरीचे पाणी भरले. वाळून चाललेले सोयाबीनचे पीक टरारून उभे राहिले आणि सोयाबीनच्या शेंगात ठासून बदाम भरले. गावच्या कोंडवाड्यातल्या वांझोट्या आणि मरतुकड्या गाई-म्हशींनी तब्बल वीस ते पंचवीस शेर दुध द्यायला सुरुवात केलीय. सलम्या खाटकाची भंगारवाल्या हमदू बरोबर पळून गेलेली तिसरी बायको सहा वर्षांनी तीन मुलांना घेऊन सलम्याकडे परत आली. गावात सगळीकडे आनंदीआनंद पसरला आहे. अशा प्रकारची पोस्ट ट्विटरवरून व फेसबुकवरून व्हायरल केल्यामुळे चर्मकार समाज बांधवाच्या व खाटिक समाज बांधवाच्या भावना दुखावल्या आहेत. तरी नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर संदीप जोशी यांच्यावर ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन गुरुवारी जिल्हाधिकार्यांना देण्यात आले.
या निवेदनावर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीता राजगुरू, जिल्हा उपाध्यक्ष दत्तराव राजगुरू, उपाध्यक्ष भिकाजी वाघमारे, प्रा.डॉ. संतोष इंगोले, प्रा.डॉ.संतोष धामणे, उपाध्यक्ष प्रा.वामनराव खंडारे, कार्याध्यक्ष पुरुषोत्तम तुपसांडे, उपाध्यक्ष ढाकरे, तालुकाध्यक्ष हरिदास कोरडे, शहराध्यक्ष सतीश खंडारे, प्रा. किशोर खंडारे, सरचिटणीस सतीश घोले इत्यादी समाजबांधवांच्या सह्या आहेत.
0 Comments