Ticker

6/recent/ticker-posts

दोन एकरांतील उभी कपाशी रातोरात मुळासकट उपटली!


चिंचखेड शिवारातील धक्कादायक प्रकार; शेतकरी पुंडलिक लसनकुटे यांचे मोठे नुकसान

अज्ञात व्यक्तीविरुद्ध पिंजर पोलिसांत तक्रार; महसूल विभागाकडून पंचनामा व मदतीची मागणी

अकोला | प्रतिनिधी गजानन भाऊ हरणे

शेतकऱ्याने दीड महिन्यांपासून लेकराप्रमाणे जपलेले कपाशीचे पीक अज्ञात व्यक्तीने रातोरात मुळासकट उपटून नष्ट केल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील चिंचखेड शिवारात घडली. या प्रकारामुळे वढवी व चिंचखेड परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

वढवी येथील रहिवासी पुंडलिक लसनकुटे यांचे चिंचखेड शिवारात सुमारे तीन एकर शेत आहे. डांबरी रस्त्यालगत असलेल्या या शेतात त्यांनी ३० जून रोजी कपाशीची लागवड केली होती. लागवडीनंतर खुरपणी, फवारणी, डवरणी आदी कामे वेळेवर करून त्यांनी पिकाची काळजी घेतली होती. त्यामुळे शेतात कपाशीचे पीक चांगल्या स्थितीत उभे राहिले होते.

मात्र, ७ ऑगस्टच्या रात्री अज्ञात व्यक्तीने शेतात प्रवेश करून सुमारे दोन एकर क्षेत्रातील हजारो कपाशीची रोपे मुळासकट उपटून नष्ट केल्याचा आरोप आहे. उपटलेली रोपे शेतात एकत्र करून टाकण्यात आल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे शेतकऱ्याच्या दीड महिन्यांच्या मेहनतीवर एका रात्रीत पाणी फेरले गेले.

सकाळी प्रकार उघडकीस

शेताची देखभाल करणारे बटईदार गजानन इपरदास हे ८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता शेतात गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. उभी कपाशी मुळासकट उपटलेली पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तत्काळ शेतमालक पुंडलिक लसनकुटे यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती परिसरात पसरताच वढवी व चिंचखेड येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शेतातील नष्ट झालेली कपाशी पाहून ग्रामस्थांनी तीव्र हळहळ व्यक्त केली. शेतकऱ्याच्या कष्टाचे असे नुकसान करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

पिंजर पोलिसांत तक्रार

या घटनेप्रकरणी शेतमालक पुंडलिक लसनकुटे यांनी पिंजर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून या प्रकरणाचा तपास सुरू करावा आणि नुकसान करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना आधीच रानडुक्कर, नीलगाय, हरीण, माकडे तसेच मोकाट जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच मानवी हस्तक्षेपातून उभे पीक नष्ट होण्याचे प्रकार घडत असल्यास शेतकऱ्यांनी शेतीचे रक्षण कसे करायचे, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

महसूल विभागाने पंचनामा करावा

या घटनेची महसूल विभागाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानाचा पंचनामा करावा, तसेच शासनाच्या नियमानुसार नुकसानभरपाई अथवा मदतीची तरतूद उपलब्ध असल्यास ती संबंधित शेतकऱ्याला मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शेतकऱ्याच्या घामाने आणि मेहनतीने उभे राहिलेले पीक उद्ध्वस्त करणाऱ्या या घटनेची पोलिस प्रशासन किती गांभीर्याने दखल घेते, आरोपीचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई केली जाते का आणि महसूल विभाग नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदतीचा हात देतो का, याकडे वढवी व चिंचखेड परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments