Ticker

6/recent/ticker-posts

वाशिम–मंगरूळपीर महामार्गावरील धोकादायक विहिरी, खड्ड्यांचे सर्वेक्षण करा


रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना करण्याची इरफान शेख यांची मागणी

मंगरूळपीर | सुधाकर चौधरी

राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील वाशिम–मंगरूळपीर मार्गावर रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहिरी, खोल खड्डे, नाले व इतर अपघातप्रवण ठिकाणांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)चे शहराध्यक्ष इरफान शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नुकत्याच पंढरपूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातही अशा प्रकारच्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम–मंगरूळपीर मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या अगदी लगत विहिरी, खोल खड्डे, नाले तसेच इतर धोकादायक जागा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विशेषतः काही ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या विहिरींना संरक्षण कठडे, सुरक्षा भिंत किंवा चेतावणी फलक नसल्याने वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी, पावसाळ्यात किंवा एखादे वाहन नियंत्रण सुटून रस्त्याबाहेर गेल्यास गंभीर दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे इरफान शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.

त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ वरील वाशिम–मंगरूळपीर मार्गाचे तातडीने संयुक्त सर्वेक्षण करण्यात यावे. रस्त्यालगत असलेल्या सर्व धोकादायक विहिरी, खड्डे, नाले व अपघातप्रवण ठिकाणांची नोंद करून तेथे क्रॅश बॅरिअर्स, सुरक्षा भिंती, लोखंडी रेलिंग, परावर्तक फलक आणि चेतावणी सूचना फलक बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून या मार्गावरील सर्व धोकादायक ठिकाणांचे कायमस्वरूपी संरक्षण करून भविष्यातील अपघात व संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जनहित आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा इरफान शेख यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments