आत्महत्येस पोलीस आयुक्त, वलगावचे ठाणेदार जबाबदार असल्याचा कुटुंबीयांचा आरोप
अमरावती : वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय किसनराव अडोकार (५४, रा. गगलानीनगर) यांनी आपल्या घरापासून काही अंतरावर एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. बदली करण्याची मागणी पूर्ण न करता निलंबनाची धमकी देत नाहक त्रास दिल्यामुळे त्यांनी हा आत्मघाती निर्णय घेतला असून पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह व वलगावचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. त्यांच्या नातेवाईकांनी फ्रेजरपुरा ठाण्यावर धडक दिली. दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका कुटुंबीयांनी यावेळी घेतली. अखेर तक्रार दाखल करून चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस उपायुक्त एम.एम. मकानदार यांनी कुटुंबीयांना दिले. विजय अडोकार यांनी आज सकाळी त्यांच्या घरापासून काही अंतरावर एका झाडाला दुपट्टय़ाच्या साहाय्याने गळफास लावला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर कुटुंबीयांसह फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले.
दरम्यान, ही घटना उजेडात आल्यावर विजय अडोकार यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी रोष व्यक्त केला. त्यानंतर कुटुंबीयांनी फ्रेजरपुरा ठाण्यावर धडक दिली. यावेळी पोलीस उपायुक्त एम.एम. मकानदार यांच्यासोबत कुटुंबीयांनी चर्चा केली. दोषींवर गुन्हा होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका यावेळी नातेवाईकांनी घेतली. त्यानंतर मृत विजय अडोकार यांच्या पत्नी संगीता यांनी तक्रार दाखल केली. प्रकृतीच्या कारणामुळे विजय अडोकार यांनी बदलीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. परंतु, वारंवार अर्ज करूनही त्यावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह व वलगावचे ठाणेदार विजयकुमार वाकसे यांनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप संगीता अडोकार यांनी तक्रारीत केला. ही तक्रार दाखल करून त्यावर चौकशी करण्याचे आश्वासन यावेळी पोलीस उपायुक्त एम.एम. मकानदार यांनी कुटुंबीयांना दिले. त्यानंतर कुटुंबीय शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात घेण्यास तयार झाले.
विजय अडोकार यांना पोलीस आयुक्त व वलगावचे ठाणेदार यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप करीत त्यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात येईल.
0 Comments