दिनांक 26 जुलै 2022
बॉम्ब शोधक पथक, वाशिम पोलीस यांना दहशतवाद विरोधी पथक अकोला यांचे कडून माहिती मिळाली की अकोला ते पूर्णा पॅसेंजर रेल्वे गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली आहे तरी या दृष्टीने खबरदारी घेण्याची सूचना प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी बॉम्बशोधक पथक व दहशतवाद विरोधी पथक मधील अधिकारी व अंमलदार यांना तातडीने वाशिम रेल्वे स्टेशनवर रवाना होण्याची व तेथे घातपात विरोधी तपासणी करण्याची सूचना दिली. त्याचप्रमाणे नियंत्रण कक्ष यांना सूचना देऊन दंगा नियंत्रण पथक सज्ज ठेवण्यास सांगितले व वाशिम शहर पोलीस स्टेशन तर्फे रेल्वे स्टेशन वाशिम येथे बंदोबस्त तैनात करण्यास सांगितले.
सदर सूचनेनुसार बॉम्बशोधक पथक व दहशतवाद विरोधी पथक यांनी तातडीने वाशिम रेल्वे स्टेशन येथे रवाना होऊन रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन अलर्ट राहण्यास सांगितले व रेल्वे स्थानक परिसराची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली. अकोला पूर्णा पॅसेंजर गाडी वाशिम रेल्वे स्टेशनवर थांबवून तिची घातपात विरोधी तपासणी करण्यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र देण्यात आले. रात्री 11.30 वा. च्या सुमारास अकोला-पूर्णा पॅसेंजर ट्रेन क्रमांक 17683 वाशिम रेल्वे स्टेशन येथे आली असता बॉम्बशोधक पथक वाशिम यांनी सदर रेल्वेच्या सर्व डब्यांची घातपात विरोधी तपासणी (Anti Sabotage Checking) स्निफर श्वान व उपकरणांच्या सहाय्याने केली. सदर तपासणी दरम्यान कोणताही स्फोटक अथवा संशयास्पद वस्तू मिळून आली नाही. सदर रेल्वे गाडीच्या सुरक्षिततेची सर्व तपासणी झाल्यानंतरच बॉम्बशोधक पथकातर्फे सदर गाडीला वाशिम रेल्वे स्टेशन वरून पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बशोधक व नाशक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे व अंमलदार, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील व अंमलदार व वाशिम शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली. वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणतीही संशयस्पद वस्तु हालचाल अथवा इसम आढळून आल्यास किंवा त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची माहिती समजल्यास त्यांनी तात्काळ वाशिम जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक 07252-234834 अथवा डायल 112 वर कॉल करून सदर माहिती पुरविण्यात यावी..
0 Comments