Ticker

6/recent/ticker-posts

केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'हर घर तिरंगा' या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल.


केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ या अभियानाद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येकामध्ये राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्यात येईल. या अभियानाच्या अंमलबजावणीत राज्य हे देशात अव्वल राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या बैठकीत दिली.

आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाबाबत केंद्रीय सांस्कृतिक विभागाने दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह  सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतून दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले.  हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात लोकसहभाग व्हावा यासाठी प्रयत्न केले जातील.  राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि वार्ड किंवा ग्रामपंचायत स्तरावर लोकसहभागातून कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या प्रत्येकाची आठवण आपण ठेवणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आजच्या पिढीला त्यांचे माहात्म्य, त्यांचे कार्य  आणि विचार समजावेत यासाठी प्रयत्न केले जातील.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, हर घर तिरंगा या अभियानाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्टदरम्यान देशातील सुमारे २० कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यात येणार असून संपूर्ण देश भारतमातेच्या सेवेत समर्पित असल्याचा एक संदेश आपण जगाला देणार आहोत. हर घर तिरंगा अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येक राज्याने राज्यातील प्रत्येक घरासाठी झेंडा मिळेल याची तयारी करावी, अशी सूचना त्यांनी केली.

Post a Comment

0 Comments