Ticker

6/recent/ticker-posts

कारंजा तालुक्यातील कोरोना लसीचा दुसरा डोस घेण्याकडे नागरिकांची पाठ!


वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड : तालुक्यात आतापर्यंत ५८ हजार ६४३ नागरिकांनी कोरोना लसीची पहिली मात्रा घेतली तर ४० हजार १९३ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. पहिल्या डोसनंतर अनेकांनी दुसरा डोस घेण्याकडे दुर्लक्ष केल्याने दुसऱ्या डोसचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.
पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोना बाधितांचे प्रमाण प्रचंड होते. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. याचा सकारात्मक परिणाम तिसऱ्या टप्प्यात दिसून आला. रुग्णांचे परिणाम देखील कमी होते, गंभीर लक्षणे देखील नव्हती. सुरुवातीला लसीकरण केंद्रावर प्रचंड गर्दी करून लसीची मात्रा घेतली. आता मात्र कोरोनाचे संकट कमी झाल्याने नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. लसीच्या पहिल्या डोसनंतर दुसरा डोस घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. कारंजा तालुक्यातील ५८ हजार ६४३ पहिल्या टप्प्यामध्ये लसीचा डोस
घेतला. यातील ३१ हजार ६७ जणांना
कोविशिल्ड व २७ हजार ५७६ लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा डोस देण्यात आला. दुसऱ्या टप्प्यामध्ये ४० हजार १९३ नागरिकांनी लसीचा डोस घेतला. यामध्ये कोविशिल्डचा १९ हजार ३७७ तर कोव्हॅक्सिनचा २० हजार ८१६ लाभार्थ्यांनी लाभ घेतला तर तिसऱ्या टप्प्यामध्ये २ हजार ८९४ लाभार्थ्यांनी लसीचा बुस्टर डोस घेतला. यामध्ये २ हजार ३२८ कोविशिल्ड तर कोव्हॅक्सिनचा ५६६ 
लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून १२ ते १४ वर्षे वयोगटातील ४ हजार ४४२ तर १५ ते १८ वर्षे वयोगटातील ८ हजार ८३५ लाभार्थ्यांचा समावेश आहे. सद्यःपरिस्थितीत कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रसार कमी असल्याने व बाधितांच्या संख्येत अधिक प्रमाणात वाढ नसल्याने नागरिकांनी कोरोना लसीकरणाकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र कारंजा तालुक्यात मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याची लागण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.


कोरोना लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर लसीची दुसरी मात्रा वेळेत न घेतल्याने पहिला व दुसरा डोसच्या टक्केवारीत फरक आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला नाही, त्यांनी लस घ्यावी तसेच दुसरा डोस घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments