अमरावती : जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्य दिवाळखोरीमध्ये निघून राज्याच्या तिजोरीवर 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा भुर्दड पडणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विधीमंडळात दिली. यावरून काॅग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी शिंदे-फडणविस सरकारवर हल्लाबोल करत चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केल्याने जर तुमच्या पोटात एेवढे दुखत असेल तर मग आमदार-खासदारांनाही कशाला हवी पेन्शन त्यांचीही पेन्शन आता बंद करण्याची आग्रही मागणी प्रजापती यांनी उपस्थित केल्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार राम सातपुते यांनी बुधवारी (ता.21) यासंदर्भातील प्रश्न विधीमंडळामध्ये उपस्थित केला. त्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नसल्याचे सांगितले. जर योजना लागू केल्यास राज्याच्या तिजोरीवर 1 लाख 10 हजार कोटी रुपयांचा भुर्दड पडणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने राज्यातील अनेक संघटना आता आक्रमक पवित्रा घेणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये काॅग्रेस पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी शिंदे-फडणविस सरकारवर हल्लाबोल करत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची आग्रही मागणी उपस्थित केली. कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमुळे जर सरकारच्या पोटात गोळा येत असेल तर राज्यातील आमदार-खासदार यांच्यामुळेही सरकारच्या तिजोरीवर भुर्दड पडत आहे. त्यामुळे जर जुनी पेन्शन योजना लागू होत नसेल तर मग आमदार-खासदारांचाही अजिबात इथे लाड खपवून घेतला जाणार नसल्याची आग्रही भूमिका प्रजापती यांनी घेतली आहे.
..
सरकारने फेरविचार करावा
जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही, अशी सरकारने घेतलेली भूमिका चुकीची आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश सरकारने जर ही मागणी पुर्ण केली तर महाराष्ट्रात का नाही, असा प्रश्न श्याम प्रजापती यांनी उपस्थित करत याचा सरकारने फेरविचार करण्याची मागणी केली आहे.
..
रणजित पाटलांनी आश्वासनांचे गाजर देऊ नये
जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा, डॉ.रणजित पाटील यांनी बुधवारी राज्य शिक्षक संघटनेच्या नागपूर येथील आंदोलनादरम्यान केली. त्यानंतर लगेचच देवेंद्र फडणविस यांनी ही योजना लागू करणे शक्य नसल्याचे सांगितले. त्यामुळे भाजप व डॉ.पाटील यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. असे म्हणत प्रजापती यांनी डॉ.पाटील यांच्यावर जोरदार टिका केली. त्यांनी उगाच आश्वासनांचे गाजर कर्मचाऱ्यांना देऊ नये असेही त्यांनी स्पष्ट केले.
--
0 Comments