मा.पोलीस अधीक्षक, वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस स्टेशन स्तरावर महिला मदत कक्ष, महिला दक्षता समिती, निर्भया पथक, विशेष बाल पोलीस पथक कार्यान्वित करण्यात आले असून जिल्हा स्तरावर महिला व बालकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महिला तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित आहे.
वाढते शहरीकरण, विभक्त कुटुंबाची वाढलेली संख्या, घरातील जेष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा अभाव, दीर्घ कामाचे तास, व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिरेक, सोशल मिडीयाचा अतिवापर यामुळे कौटुंबिक वादाच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कुटुंब व्यवस्था हि आपल्या समाजाचा एक अविभाज्य घटक असल्याने ती टिकून राहणे हे चांगल्या समाजाच्या दृष्टीने अतिआवश्यक आहे. समाजातील कुटुंब व्यवस्था हि अबाधित राहण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस विभागातसुद्धा कौटुंबिक वादाच्या तक्रारींबाबत योग्य ते समुपदेशन करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. कौटुंबिक वादाच्या तक्रारी पोलीस स्टेशन स्तरावर, जिल्हा स्तरावर स्थापन असलेल्या महिला तक्रार निवारण कक्ष येथे तडजोडीसाठी व समुपदेशनासाठी प्राप्त झाल्यानंतर तक्रारीतील अर्जदार गैरअर्जदार यांना बोलावून त्यांना समुपदेशन करून त्यांच्यातील वादाचे निराकरण करण्यात येते.
जिल्हास्तरावर पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम येथील महिला तक्रार निवारण कक्ष येथे माहे जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ मध्ये महिलांच्या कौटुंबिक वादाच्या एकूण ३३५ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये ७८ कुटुंबांचे मोडकळीस आलेले संसार पुन्हा नव्याने सुरळीत करण्यास मतनि कक्षास यश आले असून ते सुखाने नांदत आहेत. ईतर तक्रारींमध्ये सुद्धा समुपदेशन करून संसार सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. प्राप्त तक्रारींमध्ये आपसात कोणत्याही प्रकारची तडजोड न झाल्याने ५९ तक्रारींमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून १३ तक्रारींमध्ये परस्पर फारकत, १८ तक्रारी ह्या फाईल करण्यात आल्या आहेत.
मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह यांचा जास्तीत जास्त कुटुंबांचे संसार सुरळीत करण्याचा मानस असून मा.पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला तक्रार निवारण कक्ष येथे समुपदेशन करून जास्तीत जास्त कुटुंबांचे संसार सुरळीत करण्यात येत आहेत.
0 Comments