मंगरुळपिर तालुक्यातील आदर्श ग्राम वनोजा हे आदर्श व विकसनशील गाव म्हणून ओळखले जाते. एकेकाळी ग्राम स्वच्छता अभियाना मध्ये तालुका, जिल्हा व विभागातून प्रथम क्रमांक मिळवणारे आणि राज्य स्तरावरही सहभागी झालेले गाव असा नावलौकिक होता. येथे तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ११ सदस्य संख्या आहे. मात्र आज रोजी ग्राम प्रशासन, ग्रामविकास अधिकारी यांच्या निष्क्रीय व भोंगळ कारभारामुळे गाव विविध समस्यांनी ग्रासले आहे.
अनेक दिवसापासुन गावातील नाल्या घाणीच्या सांडपाण्यांनी तुबुंन भरलेल्या आहे. गावातील अंगणवाडी शाळेच्या जवळ कचऱ्याचे ढिगारे जमा झाले आहे. मात्र ग्राम प्रशासनाकडून स्वच्छतेचे तिन तेरा झाले असुन, सांडपाण्याच्या नाल्यांची, सार्वजनिक मुतारी, साफसफाई होत नसल्याने गावात सर्वत्र डासांचा उद्रेक वाढला आहे. डासांचा उपद्रव वाढल्यामुळे ग्रामस्थांना अनेक आरोग्यांच्या समस्यांना समोरे जावे लागत आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून गावालगतच नागरीकांच्या सोयी करीता सार्वजनिक शौचालय बांधले आहे. मात्र ग्राम प्रशासनाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीमुळे धूळ खात पडून आहे.
प्रभाग क्र. ४ मध्ये पाईपलाईन मध्ये नळाचे पाणी जात नाही. तसेच सार्वजनिक नळ स्टॅन्ड बरेच महिन्या पासून बंद आहे, त्यामुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. विद्युत खांबांवर लाईट बसविण्यात येत नाही. गावातील पिण्याच्या पाण्याचा विहिरी मध्ये बिचिंग पावडर टाकण्यात येत नाही. याबाबत ग्रामविकास अधिकारी, यांना वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा हेतूपरस्पर दुर्लक्ष करून, कामे केली जात नसल्याची माहिती ग्रामस्थांनी, ग्रा. पं. सदस्य यांनी दिली आहे. तसेच१५ व्या वित्त आयोगाचा निधी उपलब्ध असुन, सुध्दा अजूनही कामे सुरु केलेली दिसत नाहीत. त्यामुळे गावातील विकास कामांना खीळ बसत आहे.
काही दिवसांपूर्वी मंगरूळपिर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कैलास राव घुगे यांनी वनोजा येथे भेट दिली होती. यावेळी सुद्धा ग्रामपंचायत सदस्य यांनी, ग्रामविकास अधिकारी नियमित गावात येत नसून त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तोही होत नाही. तसेच गावातील समस्यांकडे ग्रामविकास अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची माहिती गटविकास अधिकारी यांना दिली होती. मात्र यामध्ये कुठलीही सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामुळे यांना वरिष्ठांचे पाठबळ असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात असुन, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन, कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांन मधून होत आहे.
प्रतिक्रिया:-
नळ पाईपलाईन द्वारे येणारे पाणी काही निवडक नळापुरते येते. नळ पाईपलाईन मध्ये कचरा अडकल्यामुळे पुढील मागसवर्गीय भागामध्ये पाणी जात नाही. याबाबत ग्राम विकास अधिकारी यांना वेळोवेळी सांगितले आहे. मात्र याकडे हेतू पुरस्पर दुर्लक्ष करताना दिसत आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेले नळ स्टॅन्ड, लाईट, पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत बीचिंग पावडर न टाकणे नाल्यांची साफसफाई अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहे.
मारोती इंगोले, ग्रा. पं. सदस्य वनोजा
0 Comments