वाशिम, दि. 16
: जिल्हयात सुक्ष्म सिंचनाचा वापर वाढविण्यासोबतच पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जल साक्षरता वाढविणे गरजेचे आहे. येत्या पावसाळयात पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित करण्यासाठी आणि विकेंद्रीत जलसाठे निर्माण करुन संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासोबतच जलस्त्रोतांची साठवण क्षमता पुनर्स्थापित करण्यासाठी तातडीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे यंत्रणांनी सुरु करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जलयुक्त शिवार अभियान 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, जलशक्ती अभियान 2023 आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा आढावा आजा आयोजित सभेत घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, मृद व जलसंधारण विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी सुभाष आकोसकर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी लक्ष्मण मापारी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. षण्मुगराजन पुढे म्हणाले, या अभियानाची अंदाजपत्रके त्वरीत तयार करावी. यंत्रणांचे आराखडे तयार असून वॉटर बजेटिंग देखील तयार आहे. ज्यांची अंदाजपत्रके तयार आहे, त्यांनी प्रशासकीय मान्यता मिळवून घ्यावी. जलयुक्त शिवार अभियानासाठी निधी हा जिल्हा नियोजन समिती व जलयुक्त निधीमधून ही कामे करण्यात यावी. यंत्रणांनी 90 टक्के कामे जलयुक्त शिवार अभियानासाठी करण्यात यावी. या अभियानाची जास्तीत जास्त यंत्रणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. त्यामुळे या अभियानाला लोकांचा सहभाग मोठया प्रमाणात मिळण्यास मदत होणार आहे. असे ते म्हणाले.
जलशक्ती अभियानाबाबत बोलतांना श्री. षण्मुगराजन म्हणाले, या अभियानाअंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे जिओ टॅगींग फोटो संबंधित पोर्टलवर अपलोड करावीत. यंत्रणांनी आपले उद्दिष्ट निश्चित करुन आराखडा तयार करावा. सप्टेंबरपर्यंत जलशक्ती अभियानाची कामे पूर्ण करावीत. येत्या दोन दिवसात सर्व यंत्रणांनी जलशक्ती अभियानाची आराखडे मृद व जलसंधारण विभागाकडे सादर करावी. यंत्रणांनी मोठया प्रमाणात वृक्ष लागवडीची कामे हाती घेतांना वृक्ष संवर्धनाकडे देखील लक्ष दयावे. रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामे करतांना शासकीय इमारतीवर तसेच शाळांवर ही कामे प्राधान्याने करावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.
0 Comments