Ticker

6/recent/ticker-posts

नवनिर्माण व सर्जनशील विचारसरणी हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. सतीश श्रीवास्तव


अमरावती, प्रतिनिधी – अनिता यादव

जीवनातील विविध अडचणींवर मात करण्यासाठी पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन विचार करणे अत्यंत गरजेचे असून ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’ हीच व्यक्तिमत्त्व विकास आणि यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन व्हीएनआयटी नागपूरच्या फायनान्शिअल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी केले.

जी एच रायसोनी युनिव्हर्सिटी, अमरावती (जीएचआरयूए) येथे ‘सदा ज्ञान व्याख्यानमाला’ अंतर्गत सोमवारी ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. विनायक देशपांडे होते. यावेळी कुलसचिव डॉ. स्नेहिल जायस्वाल, विद्यार्थी कल्याण विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट तसेच विविध विभागांचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डॉ. श्रीवास्तव म्हणाले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसे नाही. नव्या कल्पना, सर्जनशीलता आणि स्वतंत्र विचारांची जोड दिल्यासच खऱ्या अर्थाने प्रगती साधता येते. ‘आउट ऑफ बॉक्स थिंकिंग’ म्हणजे परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहण्याची क्षमता होय.”
ते पुढे म्हणाले, “विद्यार्थ्यांनी आपले विचार स्पष्ट, स्वच्छ आणि स्वतंत्र ठेवले पाहिजेत. अनेकदा युवकांमध्ये नवीन काहीतरी करण्याची इच्छा असते, परंतु ठोस आणि स्वतंत्र विचारांच्या अभावामुळे ते गोंधळात पडतात. परिणामी त्यांना अपेक्षित यश मिळत नाही आणि नैराश्य, तणाव वाढतो. अशा परिस्थितीत सर्जनशील विचारसरणीच त्यांना योग्य दिशा दाखवते.”

डॉ. श्रीवास्तव यांनी विविध यशस्वी उद्योजकांची उदाहरणे देत सांगितले की, सामान्य पार्श्वभूमी असलेली व्यक्ती देखील नवोन्मेषी विचारांच्या जोरावर मोठे यश संपादन करू शकते. “विचार केवळ मनात न ठेवता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे महत्त्वाचे आहे. कृतीतूनच यश मिळते,” असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन घेतले. या संवादात्मक सत्रामुळे विद्यार्थ्यांना विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आला.

कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रकाश नारायण यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन देशपांडे, कुनाल बोरकर व अश्विनी राठी यांनी विशेष प्रयत्न केले.

या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या विचारांची जाणीव निर्माण होऊन त्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.


Post a Comment

0 Comments