श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दि. १५: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. दि. २५ जुन ते ०५ जुलै या दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी (२७ जुन रोजी) २०० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी ने बससेवेसाठी केलेल्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
पंढरपूर आषाढी यात्रा हा महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय आहे. यामध्ये एसटीच्या प्रवाशी वाहतुकीला अनन्य साधारण महत्व आहे. याकाळात एसटीकडून आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्रवाशांना वारकऱ्यांना दिल्या जाव्यात. भाविक-प्रवाशांना त्यांच्या गावापासून थेट पंढरपूर पर्यंत घेऊन जाणे तसेच विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुखरूपपणे घरी आणून सोडण्याची महत्वपूर्ण जबाबदारी एसटीवर असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
0 Comments