Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाभर एकाचवेळी शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्र. २ उत्साहात संपन्न

“मंगरुळपीर येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा देताना विद्यार्थी”

मंगरुळपीर, सुधाकर चौधरी

जिल्हा परिषद वाशिमच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्रमांक २ जिल्हाभर एकाचवेळी उत्साहात पार पडली. मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. संजय ससाणे यांच्या प्रभावी नियोजनामुळे ही परीक्षा यशस्वीरीत्या पार पडल्याचे दिसून आले.

इयत्ता ४ थी व ७ वीच्या मुख्य शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज केलेल्या जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही सराव परीक्षा पूर्णपणे निःशुल्क आयोजित करण्यात आली होती. मंगळवार दिनांक ०७ एप्रिल २०२६ रोजी ही परीक्षा शाळास्तरावरच घेण्यात आली.

परीक्षेचे नियोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले असून, पेपर १ सकाळी ११.०० ते १२.३० वाजेपर्यंत तर पेपर २ दुपारी ०२.०० ते ०३.३० या वेळेत पार पडला.

मंगरुळपीर येथील पीएम श्री जि.प. माध्यमिक विद्यालयात एकूण ३७ विद्यार्थ्यांनी परीक्षेत सहभाग नोंदवला. मुख्याध्यापक एस. पी. टिक्कस यांच्या मार्गदर्शनाखाली डी. आर. राऊत, एस. एस. वासनकार, जी. पी. उखळकर तसेच कु. आर. बी. ठाकरे यांनी पर्यवेक्षक म्हणून आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली.

या सराव परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना मुख्य शिष्यवृत्ती परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याने त्यांच्या आत्मविश्वासात मोठी वाढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

---

(समाप्त)

Post a Comment

0 Comments