Ticker

6/recent/ticker-posts

बनावट बिलाद्वारे चोरीचा मोबाईल विकणाऱ्या दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल ; CEIR पोर्टलद्वारे शोधले २१२ मोबाईल संच.


        सध्याच्या इंटरनेट युगामध्ये जीवनातील दैनंदिन सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून होतात. त्यामुळे मोबाईल फोन हा जीवनाचा अत्यावश्यक भाग बनत चालला आहे. मात्र हाच मोबाईल फोन हरविल्यास किंवा चोरी झाल्यास मात्र आपली तारांबळ उडते. चोरटे हे मोबाईल फोन चोरून काही दुकानदारांना कमी किंमतीत विकतात व ते दुकानदार तेच मोबाईल संच बनावट बिलाद्वारे नवीन ग्राहकांना विकून त्यांची फसवणूक करतात. असाच एक प्रकार पो.स्टे.सायबर वाशिमच्या पथकाने कारंजा शहर हद्दीत उघडकीस आणला आहे.
          कारंजा लाड येथील रहिवाशी असलेले दीपक मनवर यांचा मोबाईल हरविल्याने त्यांनी त्याची तक्रार CEIR पोर्टलवर दाखल केली होती. CEIR पोर्टलच्या मदतीने सदर मोबाईलचा शोध घेत असतांना सदर मोबाईल हा कारंजा येथीलच रहिवाशी असलेले अल्ताफ युसुफ कालीवाले यांच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. अल्ताफ युसुफ कालीवाले यांच्याकडे सदर मोबाईलबाबत विचारणा केली असता त्यांनी तो मोबाईल कारंजा येथील एका मोबाईल शॉपमधून विकत घेतल्याचे सांगितले व त्याचे बिलही सादर केले. त्यावरून सदर मोबाईल शॉपचालक हा चोरीचे मोबाईल बनावट बिल तयार करून नवीन ग्राहकांना विकत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सदर मोबाईल शॉप चालकाविरुद्ध पो.स्टे.कारंजा शहर येथे अप.क्र.२५६/२३, क.४०३, ४६५, ४७१ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
          केंद्र शासनाच्या CEIR वेबपोर्टलवर हरविलेल्या मोबाईलचा शोध घेणे सोयीचे झाले असून नागरिकांनी त्यांचा मोबाईल फोन हरविल्यास/चोरी झाल्यास तत्काळ www.ceir.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली तक्रार नोंदवावी. सन २०२२ मध्ये वाशिम जिल्ह्यात ५०२ मोबाईल फोन हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी १६५ मोबाईल फोन वाशिम पोलीस दलातर्फे CEIR पोर्टलद्वारे शोधण्यात आले असून मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. तसेच सन २०२३ मध्ये आजपावेतो एकूण १७७ मोबाईल फोन हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी एकूण ४७ मोबाईल फोन्सचा शोध घेऊन ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. अश्याप्रकारे एकूण २१२ मोबाईल संच शोधून मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
     सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.प्रशांत कावरे, सपोनि.संदीप नरसाळे, पोशि.दीपक घुगे, मपोशि.कोमल गाडे सर्व नेमणूक सायबर पोलीस स्टेशन वाशिम यांनी पार पाडली. नागरिकांनी त्यांचा मोबाईल फोन हरविल्यास/चोरी गेल्यास CEIR पोर्टलवर तक्रार दाखल करावी व सायबर पोलीस स्टेशन, वाशिम येथे भेट द्यावी, असे आवाहन वाशिम पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.
 

    

Post a Comment

0 Comments