शिवप्रेमींचा उत्साह कसा असतो, याची प्रचिती गडावर आली. केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशभरातील शिवप्रेमींनी गडावर हजेरी लावून सोहळ्याचे क्षण डोळ्यात साठवले. दिवसभर ते गडावर येत होते. अन्नछत्रात त्यांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी रणरणत्या उन्हात गड त्यांच्या गर्दीने फुलून गेला. होळीच्या माळावर सायंकाळी पाच वाजता 'धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची,
उपक्रमात लाठी, पट्टा, फरी गदका, दुहाती पट्टा व तलवार लढतींने शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले.युवराज संभाजीराजे छत्रपती व शहाजीराजे छत्रपती गडपायथ्यापासून पायी गडावर आले. त्यांचे उत्साहात साजरी स्वागत करण्यात आले. त्यांनी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्यासमवेत युद्धकलेच्या प्रात्यक्षिकांची झलक अनुभवली. हलगीचा कडकडाटावर प्रात्यक्षिके सादर झाली. हलगीवादकाने हलगीचे उत्कृष्ट सादरीकरण करुन शिवप्रेमींचा उत्साह वाढवला. वस्ताद पंडित पोवार, संदीप सावंत, प्रदीप थोरवत, युवराज पाटील, विनोद साळोखे, जितेंद्र पवार, रवींद्र जगदाळे, अमित गडांकुश, योगेश पाटील उपस्थित होते.
त्यानंतर राजसदरेवर शाहिरांनी शाहिरीतून शिवप्रेमींना चेतवले. या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे, या गीतावर ते डोलले. यशवंत गोसावी यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन करत शिवप्रेमींचा उत्साह दुणावला. शाहीर विशारद डॉ. आझाद नायकवडी, देवानंद माळी, दिलीप सावंत, सुरेश जाधव, राजेंद्र कांबळे, यशवंत जाधव, अजिंक्य लिंगायत, स्वप्निल डुंबरे, गणेश गलांडे यांनी शाहिरी सादर केली.
आजचे कार्यक्रम असे :
स. ७.०० वा. रणवाद्यांच्या जयघोषात युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते ध्वजपूजन, ध्वजारोहन स्थळ : नगारखाना
स. ७.३० वा. शाहीरी कार्यक्रम. स्थळ : राजसदर
स. ९.३० वा. श्रीराजा शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे वाद्यांच्या गजरात आगमन. स्थळ : राजसदर
स. ९.५० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत
व राजसदरेवर आगमन
स. १०.१० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या हस्ते श्रीराजा शिवछत्रपती महाराजांना अभिषेक
स. १०.२० वा. श्रीराजा शिवछत्रपती महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक
स. १०.३० वा. युवराज संभाजी छत्रपती महाराज यांचे शिवभक्तांना संबोधन
स. १०.३० वा. ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ युवराज संभाजी छत्रपती महाराज व सर्व शिवभक्तांच्या समवेत
जगदिश्वराच्या दर्शनासाठी श्रीराजा शिवछत्रपती महाराजांच्या पालखीचे प्रस्थान.
दु. १२.०० वा. जगदीश्वर मंदिर दर्शन
दु. १२.१० वा. श्रीराजा शिवछत्रपती महाराजांच्या समाधीस अभिवादन !
0 Comments