Ticker

6/recent/ticker-posts

नागरिकांनी श्री गणेशोत्सव नियमांचे पालन करून उत्साहात आणि शांततेत साजरा करावा. - पोलीस अधीक्षक, वाशिम.

 दि.१९.०९.२३ रोजी पासून गणेशोत्सव संपूर्ण जिल्ह्यात हर्षोल्हासात सार्वजनिक स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण ६९६ गणेश मंडळांची स्थापना होणे संभावित असून त्यामध्ये शहरी भागात २६६ श्री गणेश मंडळे तर ग्रामीण भागात ४३० श्री गणेश मंडळे स्थापन होणार आहे. दि.०६.०९.२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली मा.पोलीस अधीक्षक, वाशिम आणि इतर प्रशासकीय अधिकारी गणेश मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य यांचे उपस्थितीत जिल्हास्तरीत शांतता व समन्वय बैठक पार पडली.
त्यानुषंगाने श्री गणेशोत्सव विसर्जन मार्गात येणाऱ्या समस्या/अडचणी जाणून घेण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व संबंधित विभागांचे अधिकारी यांचेसह पोलीस स्टेशन स्तरावर संयुक्तरीत्या विसर्जन मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. विसर्जन मार्गात असणारे खड्डे, नादुरुस्त वाहने, लोंबकळलेल्या विद्युत तारा/केबल इ. अडथळे दूर करण्याचे प्रयत्न प्रशासन स्तरावर सुरु आहेत. श्री गणेशोत्सव निमित्त पूर्व तयारी म्हणून पो.स्टे.स्तरावर शांतता समिती सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी, मूर्तिकार, DJ मालक/चालक, सर्व संबंधित प्रशासकीय विभागाचे अधिकारी यांच्या बैठकांच्या आयोजनाचे सत्र सुरु आहे. आजपावेतो जिल्ह्यात एकूण १५८ बैठका घेण्यात आल्या असून ७७५ ग्रामभेटी देऊन जनतेशी थेट संपर्क साधून गणेशोत्सव साजरा करतांना निर्माण होणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला आहे. गणेशोत्सव दरम्यान सामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरिता पो.स्टे.स्तरावर रूट मार्चचे आयोजन करण्यात येत आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रत्येक हालचालीवर निगराणी ठेवण्याकरिता विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी CCTV कॅमेरा लावण्यात येणार असून प्रत्येक गणेश मंडळावर QR Code लावण्यात येणार आहे व  भेट देणारे पोलीस अधिकारी/अंमलदार यांचेकडून QR Code स्कॅन करण्यात येईल. सराईत गुन्हेगारांवर वचक राहावा याकरिता यापूर्वीच पो.स्टे.स्तरावर विविध दिवशी कोम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात राबविण्यात आली आहे. उत्सव काळात संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट नेमण्यात येणार आहेत.
ध्वनी पातळीच्या मर्यादेबाबत ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) २००० मधील तरतुदींचे आणि मा.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, गणेश मंडळांनी सणाचे पावित्र्य राखून सामाजिक एकोपा टिकून राहावा यादृष्टीने नियमांचे काटेकोर पालन करून सण उत्साहात साजरा करावा, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे. मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी बाहेरून बंदोबस्तासाठी आलेल्या १० प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक व १५० प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार व ०१ SRPF कंपनी अधिकारी/अंमलदार यांचेशी संवाद साधून त्यांना श्री गणेशोत्सव - २३ बंदोबस्त संबंधाने मोलाचे मार्गदर्शन केले व बंदोबस्तासाठी शुभेच्छा दिल्या.
श्री गणेशोत्सव निमित्त वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ०१ पोलीस अधीक्षक, ०१ अपर पोलीस अधीक्षक, ०४ पोलीस उपअधीक्षक, १७ पोलीस निरीक्षक, ५५ सहा.पोलीस निरीक्षक, १० प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक, १२०० पोलीस अंमलदार, १५० प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार, ०२ RCP व ०२ QRT पथक, ५७५ होमगार्ड, ०१ SRPF कंपनी इतका बंदोबस्त नेमण्यात आला आहे. जिल्ह्यात कोणतीही कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास वाशिम जिल्हा पोलीस दल सुसज्ज असून नागरिकांनी आपातकालीन परिस्थितीत DIAL 112 वर संपर्क करावा.


         ( जनसंपर्क अधिकारी )
   पोलीस अधिक्षक, वाशिम करिता

Post a Comment

0 Comments