वाशिम, ता. 20 मे – वाशिम शहरातील ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार नितीन मुकुंदराव पगार (वय अंदाजे 45) यांचे आज पहाटे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वाशिम जिल्ह्यातील पत्रकारिता, कला, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
नितीन पगार हे वाशिम जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील एक झुंजार आणि परखड व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी निर्भीड पत्रकारिता केली असून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे अनेक लेख त्यांनी लिहिले होते.
पत्रकारितेसोबतच ते एक उत्कृष्ट कलावंत, लेखक आणि दिग्दर्शकही होते. ‘ऑपरेशन दगड’ या त्यांच्या दिग्दर्शनातील नाटिकेने विशेष ख्याती मिळवली होती. अनेक नाटके, एकपात्री प्रयोग व एकांकिका त्यांनी सादर केल्या. त्यांचा समाजाशी आणि वाचकांशी असलेला नवा दृष्टिकोन व मनस्वी शैली यामुळे त्यांचा एक खास चाहता वर्ग तयार झाला होता.
मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. वाशिम येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पगार कुटुंबियांसह संपूर्ण पत्रकारिता विश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ व तीन बहिणी असा मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्यावर आज दिनांक 20 मे रोजी सकाळी 10 वाजता मोक्षधाम, वाशिम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
श्रमिक पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष श्री. सुधाकर चौधरी आणि 'वाशिम खबर आवाज महाराष्ट्र' परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सदगती देवो, हीच प्रार्थना
0 Comments