नातवंडाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यासाठी निधी
भुसावळ, कुर्हे पानाचे (ता. १ मे) :
गावाचा विकास शिक्षणातूनच होतो, हे जाणून शिक्षण क्षेत्रात सतत योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी आपल्या कुटुंबियांच्या स्मृतीप्रित्यर्थ रा.धो. माध्यमिक विद्यालयाला रुपये ११,०००/- ची देणगी दिली आहे. या रकमेचा उपयोग करून शाळेत उत्कृष्ट विद्यार्थ्यांसाठी दोन विशेष पारितोषिकांची स्थापना करण्यात आली आहे.
ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य असलेले प्रा. डॉ. ललवाणी यांनी आपल्या नातू चि. मनीत ललवाणी व आई स्व. ताराबाई ललवाणी यांच्या वाढदिवसानिमित्त हे योगदान दिले. देण्यात आलेली रक्कम शाळेच्या खात्यात कायमस्वरूपी ठेव म्हणून जमा केली जाईल आणि त्यावरील व्याजातून दरवर्षी हे ‘चि. मनीत ललवाणी पारितोषिक’ (उत्कृष्ट विद्यार्थी) व ‘स्व. ताराबाई ललवाणी पारितोषिक’ (उत्कृष्ट विद्यार्थिनी) वितरित केले जाणार आहे.
याप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन अप्पासाहेब एकनाथजी बडगुजर, माजी मुख्याध्यापक आर. व्ही. गवळी, मुख्याध्यापक एस. पी. चौधरी व पर्यवेक्षक एस. डी. वाघ उपस्थित होते.
या उपक्रमासाठी माजी मुख्याध्यापक आर. व्ही. गवळी यांनी विशेष पुढाकार घेतला.
चेअरमन बडगुजर म्हणाले, “गावातील शाळेला दिलेली ही देणगी ही केवळ आर्थिक मदत नसून एक प्रेरणादायी संकल्पना आहे. अशा सन्मानामुळे विद्यार्थी प्रोत्साहित होतील आणि गुणवत्तेच्या वाटेवर अधिक ठामपणे वाटचाल करतील.”
कार्यक्रमाच्या शेवटी पारितोषिकांसाठी दिलेल्या रकमेचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्याकडे औपचारिकरित्या सुपूर्द करण्यात आला.
0 Comments