Ticker

6/recent/ticker-posts

मंगरुळपीरच्या वाय.सी. सीबीएसई इंग्लिश स्कूलमध्ये ‘विठ्ठलनामाची शाळा’; चिमुकल्या वारकऱ्यांच्या दिंडीतून भक्ती, संस्कृती आणि पर्यावरणाचा संगम



मंगरुळपीर (सुधाकर चौधरी)
"पुंडलीक वरदान हरि विठ्ठल" च्या जयघोषात मंगरुळपीर येथील वाय.सी. सीबीएसई आणि एका इंऐग्लिश स्कूलच्या प्रांगणात आज एक आगळी वेगळी शाळा भरली – 'विठ्ठल नामाची शाळा'! आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषेत दिंडी काढत पारंपरिक वारकरी परंपरेचे दर्शन घडवले. या भक्तिभावपूर्ण उत्सवात पर्यावरण संवर्धनाचा अनमोल संदेश दिला गेला, ज्यामुळे हा उपक्रम केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक भान जपणारा ठरला.

शाळेच्या आवारात टाळ-मृदंगाच्या गजरात, गगनभेदी नामस्मरणात विद्यार्थी विठ्ठल-रुक्मिणी, संत जनाबाई, संत तुकाराम, मुक्ताबाई, नामदेव, एकनाथ आदी संतांच्या वेशात रिंगण करत विठ्ठलभक्तीचे दर्शन घडवीत होते. 'वारी म्हणजे भक्तीची चालती-बोलती पाठशाळा' हे जणू या उपक्रमातून प्रत्ययास आले.

दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात "वृक्ष लावा – जीवन वाचवा", "प्लास्टिक बंदी करा", "स्वच्छता ही सेवा आहे" असे पर्यावरणपूरक संदेश असलेले फलक घेतले होते. पारंपरिकतेतून आधुनिक काळातले संदेश देणारी ही ‘वारी’ पाहून पालक, शिक्षक व नागरिक भारावून गेले.

या कार्यक्रमामागे शाळेचा व्यापक दृष्टिकोन दिसून येतो. केवळ पुस्तकी शिक्षण न देता, विद्यार्थ्यांच्या मनात संस्कृतीची मुळे घट्ट रोवण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जागवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. भक्ती, परंपरा, निसर्गप्रेम आणि सामाजिक जाणीव यांचा सुयोग्य संगम या उपक्रमातून साधला गेला.


या दिंडीसाठी शाळेचे प्राचार्य डॉ. संजीव कुमार सिंग यांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षिका वैशाली धागे, स्वाती रघुवंशी, समीर नंदावाले, प्रीती ठाकरे, कोमल म्हातारमारे, निधी बजाज, अंकित जवळकर, स्नेहल साधू, दीपाली भोजने, माधुरी रक्षे, राम वानखडे, भूषण ठाकरे, भूमिका उज्जैनकर, श्रीकांत राऊत, अक्षय इंगोले, हरीश सावंत, वकील खान, योगेश बहाकर, हरीश डहाके, ओम येवले आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी संयोजनात मोलाचे योगदान दिले.

शाळेतील हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात श्रद्धा, मूल्य, आणि सामाजिक भान यांची गंगा एकवटण्याचा यशस्वी प्रयत्न ठरला. आषाढीच्या या पवित्र दिवसाने शाळेत केवळ एक कार्यक्रम घडवला नाही, तर एक संस्कार शिबिरच भरवले!


Post a Comment

0 Comments