Ticker

6/recent/ticker-posts

य.च. सैनिक शाळेत "एक पेड माँ के नाम" अभियानांतर्गत वृक्षारोपण



वाशिम तालुका प्रतिनिधी :
सद्यस्थितीत बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. सजीवसृष्टीसोबतच शेती आणि ग्रामीण जीवनावरही त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. अशा काळात वृक्षारोपण हेच निसर्ग रक्षणाचे सर्वात मोठे शस्त्र ठरते. याच पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण सैनिक शाळा, सुपखेळा येथे “एक पेड माँ के नाम” या अभियानाअंतर्गत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला.

शाळेचे प्राचार्य सी.एम. ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “एक झाड लावून आपण आपल्या आईला आणि पृथ्वीमातेचे वंदन करतो. भारत कृषीप्रधान देश असल्याने वृक्ष लागवड ही शेती व पर्यावरणासाठी आवश्यकच आहे. जैवविविधता टिकविण्यासाठी आपण सर्वांनी या अभियानात सहभागी होणे गरजेचे आहे.”

यानंतर राष्ट्रीय हरित सेनेचे समन्वयक महादेव वानखडे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना म्हटले की, “फक्त झाड लावणे पुरेसे नाही तर त्याचे संगोपन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. आपण शाळेत, घरी, शेतात किंवा रिकाम्या जागी कुठेही झाड लावून ते जोपासले तरच खऱ्या अर्थाने आपण या अभियानात सहभागी झालो असे मानले जाईल.”

आजपर्यंत शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मिळून तब्बल ६६४ झाडांची लागवड केली असल्याची माहिती राष्ट्रीय हरित सेनेचे सदस्य एस.एस. मोळके यांनी दिली. या उपक्रमाला इको क्लबच्या माध्यमातून शाळेतील सर्व विद्यार्थी, प्राचार्य, वर्गशिक्षक तसेच हरित सेनेचे सदस्य एस.एस. मोळके, आर.ए. सरनाईक, एस.एस. दिपरकर, बी.व्ही. देशमुख, व्ही.एम. जाधव, ए.आर. खांदवे, कु. डी.पी. पाटील, एन.ए. पडघान आदींनी मार्गदर्शन केले. तर शिक्षकवर्गातील ए.ए. गवळी, एस.बी. कराडे, जी.टी. मोरे, के.व्ही. बोबडे, एस.एम. गाभणे, कु.डी.आर. शिंदे, एम.एन. ढोबळे, एस.व्ही. वाकुडकर, आर.जी. नकवाल, एस.आर. सातपुते आदींनी सहकार्य केले.

तसेच या उपक्रमाला सुखदेव उगले, सुभाष चौधरी, योगेश इंगोले, श्रीकांत ठग, अंकुश ठाकरे आदींचेही मोलाचे सहकार्य लाभले. शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधुभगिनींनीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग नोंदवून उपक्रमाला यश मिळवून दिले.

हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याची माहिती प्रसिद्धी विभाग प्रमुख रमेश रावसिंग पडवाळ यांनी दिली.


Post a Comment

0 Comments