"दहा वर्षांची प्रतीक्षा, एका आदेशात संपली – धानोऱ्याचा थांबा पुन्हा जिवंत !"
धानोरा खुर्द –
कागदावर मंजूर होऊनही दहा-बारा वर्षे धुळ खात पडलेला धानोरा खुर्द जलद व अति जलद एस.टी. बसथांबा अखेर सुरू झाला आहे. हा क्षण पाहण्यासाठी वाट पाहणाऱ्या परिसरातील प्रवाशांनी जणू सुटकेचा नि:श्वास टाकला.
सन २०१३ साली तत्कालीन राज्यमंत्री (परिवहन) यांच्या मंजुरीने आणि माजी शिक्षक आमदार वसंतराव खोटरे यांच्या अथक पाठपुराव्याने धानोरा खुर्द येथे जलद व अति जलद बसेस थांबविण्याचा निर्णय झाला होता. पण हा निर्णय फक्त सरकारी फाईलपुरता मर्यादित राहिला. प्रवाशांची व्यथा वाढत गेली, गाड्या धावत राहिल्या… पण धानोऱ्याचा थांबा मात्र रिकामाच राहिला.
२०१४ मध्ये शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही या अन्यायाविरोधात आवाज उठवून आगार प्रमुखांना सूचना करून घेतल्या, तरीही काहीच बदल झाला नाही.
दरम्यान, आसेगाव, कुंभी, लही वसंतवाडी, पिंपळगाव, शिवणी, नांदगाव, चिंचोली, सनगाव, भडकुंबा, रामगड, शेगी, कळंबा, मसुला, दस्तापूर, कासोळा, बिटोडा, सारशी, चिंचखेडा आदी गावांतील प्रवासी उंबरठ्यावर उभे राहून गाड्या जाताना पाहतच राहिले. मुंबई-पुण्याला कामासाठी जाणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या हातांना रोजचा हा त्रास चटका देत राहिला.
ही व्यथा अखेर भाजपा शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष प्राचार्य मंगेश धानोरकर यांच्या पुढाकाराने, सरपंच मंडळींसह आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या दरबारात पोहोचली. जनतेचा त्रास ऐकून आमदार खोडे यांनी वेळ न दवडता अकोला विभाग नियंत्रक आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट फोन लावला.
आदेश निघाले, धानोरा खुर्द फाट्यावर कर्मचाऱ्याची नेमणूक झाली आणि गाड्या न थांबविणाऱ्या चालकांची नोंदणी सुरू झाली. आणि पाहता पाहता – कंधार, संभाजीनगर, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, जालना, नागपूर, अमरावती, गडचिरोली अशा अनेक आगारांतील जलद व अति जलद बसेस धानोरा खुर्द येथे थांबू लागल्या.
ही केवळ बसथांबा सुरू होण्याची गोष्ट नाही; हा आहे वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या प्रवाशांच्या संयमाचा विजय! या सोयीमुळे प्रवाशांचा त्रास तर कमी झाला, पण परिवहन महामंडळाच्या महसुलातही चांगली वाढ होणार आहे.
या क्षणाचे साक्षीदार म्हणून मंगेश धानोरकर, संवेद विशाल धानोरकर, गणेश टोपले, शिगोकार साहेब, आसेगावचे सरपंच, नांदगावचे सरपंच, सनगावचे मिटकरी-डुकरे परिवार, भगत परिवार, चिंचखेडाचे बबनराव चौधरी, शिवणेचे विठ्ठलराव भेंडेकर, बाबाराव भांडेकर, धानोऱ्याचे भाऊ नाईक आणि इतर अनेक ग्रामस्थ हजर होते. जनतेने आमदार श्यामभाऊ खोडे यांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
0 Comments