वाशिम खबर आज महाराष्ट्राचे संपादक सुधाकर चौधरी
मानोली
शेतशिवारांच्या शांत लहरींमध्ये, बैलगाड्यांच्या चाकांवर फिरणाऱ्या गावाच्या चालीत, आज तंत्रज्ञानाचा एक नवा सूर झंकारला. भगवंतराव महाकाळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मानोली येथे ग्रामीण शिक्षणाच्या क्षितिजावर एक अभिमानाचा क्षण उभा राहिला — डिजिटल प्रशिक्षण व संसाधन केंद्रचे भव्य उद्घाटन.
शेअर अँड केअर फाऊंडेशन, यूएसए या परदेशी मित्रांनी गावच्या लेकरांसाठी दिलेली ही अमूल्य भेट — तब्बल 20 संगणक आणि 1 स्मार्ट बोर्ड — म्हणजे शिक्षणाच्या मंदिरात आलेली नवयुगाची दीपमाळ.
उद्घाटन सोहळा वाशिम-मंगरूळपीरचे लोकप्रतिनिधी मा. श्री. श्यामभाऊ खोडे यांच्या हस्ते मंगल व भावपूर्ण वातावरणात पार पडला. व्यासपीठावर शाळेचे अध्यक्ष मा. श्री. लक्ष्मीकांतजी महाकाळ, मा. श्री. चंद्रकांतदादा ठाकरे (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष), मा. सौ. मंगल धोपे (शिक्षणाधिकारी, वाशिम), मा. श्रीकांत माने (गटशिक्षणाधिकारी, मंगरूळपीर) यांच्यासह शिक्षण व समाजजीवनातील मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार श्यामभाऊ खोडे भावुकतेने म्हणाले,
"गावातील मुलांना आता शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा कमी काहीच राहणार नाही. संगणक साक्षरता ही आज काळाची हाक आहे. हा प्रगत संगणक कक्ष आपल्या पोरांना जगाशी जोडणारा पूल ठरेल."
शाळेचे अध्यक्ष लक्ष्मीकांतजी महाकाळ यांनी या उदात्त कार्यासाठी शेअर अँड केअर फाऊंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले. "विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांना सक्षम बनवण्यासाठी उच्च दर्जाचे संगणक प्रशिक्षण दिले जाईल. या कक्षातून नवनवीन स्वप्ने साकार होतील," असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाला मा. श्री. प्रफुल निकम (अध्यक्ष, वाय फोर डी फाऊंडेशन, पुणे) व मा. सतीश हिवरकर (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप) यांचे प्रभावी सहकार्य लाभले. शाळेच्या प्राचार्या मा. सौ. पूनम महाकाळ व वाय फोर डी फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक दिपक टिकले यांनी या कार्यासाठी जिद्द व समर्पणाने मोलाचा वाटा उचलला.
आज गावातला हा कक्ष फक्त लोखंड-प्लास्टिकचा नाही; तो आहे तरुणाईच्या स्वप्नांचा कारखाना, भविष्याच्या उजेडाचा दिवा आणि मानोलीच्या शिक्षणाच्या नव्या पहाटेची पहिलीच किरणरेषा.
0 Comments