ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा होणारा 'मैत्रीदिन' हा आता फक्त शुभेच्छा देण्यापुरता उरला आहे का? की त्यामागे खरंच काही अंतःकरणातून उमटणारी भावना आहे?
आज आपण एकमेकांना "Happy Friendship Day" चे मेसेज पाठवतो, रंगीबेरंगी बँड बांधतो... पण कधी स्वतःला विचारलं आहे का "मी खरंच कोणाचातरी मित्र आहे का?" "माझ्यात मैत्रीची पात्रता आहे का?"
पण या नात्यात
ना मी धर्म पाहिला, ना जात
ना आर्थिक उंच-नीच
ना शिक्षण, ना प्रतिष्ठेचा स्तर...
मी पाहिलं फक्त एकच –
त्या डोळ्यांमागचं खरं माणूसपण… आणि त्याच्या मनात असलेली आपुलकी.
मी नेहमी परमेश्वराला साक्ष ठेऊन
ही मैत्री जोपासली,
कधीही कुणाला हेवा केला नाही,
कधीही कुणावर स्वार्थी प्रेम लादलं नाही,
आणि कधीही नात्यांची बोली लावली नाही.
माझं मित्रत्व हे देवासमोरही ताठ मानेनं उभं राहिलंय.
कारण त्यात स्वार्थ नव्हता, राजकारण नव्हतं,
फक्त निखळ आपुलकी होती.
ही आपुलकी म्हणजे प्रेम…
हे प्रेम म्हणजे अस्तित्व…
आणि हे अस्तित्व म्हणजेच मी…!
माझं संपूर्ण आयुष्यच
ही मैत्री परमेश्वराच्या चरणी अर्पण करण्यासारखं वाटतं.
कारण मी कुठेही भेदभाव केला नाही,
फक्त माणुसकीच्या नात्याला मान दिला.
आज मागं वळून बघितलं,
तर कुणी मला आठवत असेल, कुणी विसरून गेला असेल…
पण मला खात्री आहे —
मी जिथे कुणाच्या आयुष्यात होतो,
तिथे मी खरं होतो,
खोटं दाखवण्यासाठी कधीच उभा राहिलो नाही.
मैत्री माझ्यासाठी सण नाही,
ती माझ्या श्वासात आहे…
मी जगतो तोपर्यंत, आणि
शेवटचा श्वास घेतानाही
ज्यांनी मला खऱ्या मनानं साथ दिली –
त्यांचं नाव माझ्या मनात असेल… ओठांवर नसेल तरीही.
खरी मैत्री ही नात्यांची गणितं लावत नाही.
तिथं ना पद, ना पैसा, ना प्रतिष्ठा महत्वाची असते –
तर असतो तो एक विश्वास…
जिथं दुसऱ्याच्या वेदना आपल्या हृदयात खोलवर घुसतात…
आणि त्यावर आपण आपल्या शब्दांनी नव्हे, तर उबदार अस्तित्वानं फुंकर घालतो.
इतिहासाच्या पानात डोकावून पाहिलं,
तर छत्रपती संभाजीराजे आणि कविकलश यांची मैत्री हा आपल्यासाठी एक दीपस्तंभ आहे.
सत्ता, कैद, छळ, मृत्यू – काहीही आलं,
पण कविकलशांची निष्ठा डगमगली नाही.
ही होती ती खरी मैत्री –
अटी नसलेली, अंतर नसलेली, आणि संकटात अधिक घट्ट होत गेलेली.
आजच्या काळात अशी मैत्री दुर्मिळ आहे.
कारण आज आपल्या नात्यांमध्ये "गरज" आहे,
"स्वार्थ" आहे,
आणि "सौदा" आहे…
पण मैत्री मात्र त्या सगळ्याच्या पलीकडे असते.
मी माझ्या आयुष्यात मैत्री केली ती कधीही अटी न घालता.
मान-सन्मान मिळो वा न मिळो,
पण मी कधीच त्या नात्याच्या बाजारीपणात हरवून गेलो नाही.
माझ्या प्रत्येक मित्राच्या वेदना मी माझ्याच जिव्हारी घेतल्या.
आणि आजही घेतो…
आज "मैत्रीदिन"!
पण खरंतर मैत्री ही एक दिवसापुरती गोष्ट नाही...
ती एक श्वास आहे,
एक भावना आहे…
ज्याला मोजता येत नाही, पण अनुभवता मात्र नक्की येतं.
मैत्री म्हणजे नेहमी हसणं नाही,
कधी कधी अबोल होऊनसुद्धा समजून घेणं असतं…
मैत्री म्हणजे एकमेकांच्या वाट्याचं दुःख
हळूच आपल्याच ओझ्यासारखं उचलणं असतं.
आपण आयुष्यात कितीही यशस्वी झालो,
पण जो आपल्याला अपयशात सोबत उभा राहतो,
तोच खरा मित्र!
कारण संकटाच्या काळात
फेसबुक फ्रेंड नसतात,
तर खांद्यावर हात ठेवणारे माणसं असतात.
मैत्रीत "मी" आणि "तू" नसतं –
तिथं असतं "आपलं"
जिथं बोलणं नसलं तरी समजूत असते,
जिथं रुसवा असतो पण फाटाफुटी नाही,
जिथं दुरावा असतो पण तुटकपणा कधीच नसतो…
आपण अनेक नाती कमावतो,
पण मैत्री हे एकच नातं आहे
जे निवडून मिळतं,
आणि विश्वासाने फुलतं…
मैत्री म्हणजे संभाजी राजे आणि कविकलश,
मैत्री म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा,
मैत्री म्हणजे आजही
शाळेच्या बाकावरचं शेवटचं अर्धं समोसं वाटून खाणं…
मी आजवर खूप नाती पाहिली –
कोणीतरी उपयोगापुरतं जवळ आलं,
कोणीतरी गरजेनंतर विसरून गेलं…
पण खरं सांगतो –
जी माणसं माझ्या आयुष्यात ‘मित्र’ म्हणून आली,
त्यांना मी कधीच 'कामापुरती सावली' बनवलं नाही.
मी त्यांना मनापासून जोडलं…
ना स्वार्थ ठेवला, ना अपेक्षा.
म्हणून आज मैत्रीदिनाच्या निमित्ताने
मी कोणालाही बॅंड, ग्रीटिंग कार्ड किंवा फुलं देणार नाही…
मी फक्त डोळे मिटून
त्या प्रत्येक मित्रासाठी मनापासून प्रार्थना करणार…
की तो कायम आनंदी राहो,
संपत्तीपेक्षा आपुलकीत न्हालेला असो,
आणि त्याच्या आयुष्यात कधीच एकटेपणाची वेळ येऊ नये.
कारण मैत्री म्हणजे दुसऱ्याच्या दुःखातही स्वतःचं अस्तित्व शोधणं.
मैत्री म्हणजे कधीच न तोडलेलं, न विकलेलं, न विसरलेलं नातं…
🌿
मैत्रीदिनाच्या या दिवशी –
मी हात जोडून नम्रपणे
मनापासून शुभेच्छा देतो
ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात
मैत्रीचा खराखुरा अनुभव आला…
ही मैत्री नित्य असो…
शब्दांत नाही, तर
हृदयाच्या गाभ्यात सदा फुलत राहो.
– सच्च्या मैत्रीचा एक साधा वारकरी, आपलाच,
सुधाकर चौधरी
0 Comments