धानोरा खुर्द : येथील श्री धानोरकर आदर्श विद्यालयात दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव तथा प्राचार्य माननीय श्री मंगेश भाऊ धानोरकर होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. धानोरकर मॅडम तसेच श्री. उचित सर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी आपापली मनोगते व भाषणे सादर करत अण्णाभाऊंच्या जीवनकार्याचा गौरव केला.
प्रमुख अतिथी श्री. उचित सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक विषमतेवर केलेल्या प्रहाराचा उल्लेख करत अण्णाभाऊंच्या कार्याची गरज आजही तितकीच भासते, असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. मंगेश भाऊ धानोरकर यांनी अण्णाभाऊ साठे यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियामध्ये पोहोचवून जगाला मराठी संस्कृतीची ओळख कशी करून दिली, याचे मार्मिक विवेचन विद्यार्थ्यांसमोर मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ८ वीची कु. नेहा सानप हिने तर आभारप्रदर्शन कु. शुभांगी भगत हिने केले. या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची मांडणी उत्साहात झाली असून विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे वातावरण भारावले होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याचा उज्ज्वल वारसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा विद्यालयाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरला.
0 Comments