Ticker

6/recent/ticker-posts

किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन शिबिर — शास्त्रीय माहिती, आत्मविश्वास आणि सशक्तीकरणाचा संदेश


"किशोरवयीन मुलींच्या जीवनात प्रकाश टाकणाऱ्या उज्वला ताई वैद्य"

किशोरवय - समजून घेतल्यास सशक्ततेचा पहिला टप्पा"

आष्टी (प्रतिनिधी) –
किशोरवयात पदार्पण करणाऱ्या मुलींसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा प्रवास हा नैसर्गिक असला, तरी या टप्प्यात योग्य मार्गदर्शन आणि शास्त्रीय माहितीचा अभाव अनेकदा गैरसमज आणि भीतीला कारणीभूत ठरतो. या पार्श्वभूमीवर हॄतात्मा राष्ट्रीय विद्यालय, आष्टी येथे दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी विशेष मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा आष्टी आणि निर्मल उज्वल बहुउद्देशीय सामाजिक संस्था, आष्टी (जि. वर्धा) यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या शिबिराचे अध्यक्षस्थान मा. मुख्याध्यापक श्री. पुंडलिक नाकतोडे यांनी भूषविले. मार्गदर्शक म्हणून कु. उज्ज्वला वैद्य आणि सौ. रश्मी गीरडे यांनी संवादात्मक शैलीत विद्यार्थिनींना शास्त्रीय आणि जीवनाशी निगडित माहिती दिली.

या सत्रात किशोरवयातील शारीरिक बदल, मानसिक व भावनिक चढउतार, मासिक पाळीबाबतचे समज-गैरसमज, स्वच्छतेचं महत्त्व, प्रेम व आकर्षण यातील फरक, ‘आई-मुलगी’ नात्यातील संवाद, ध्येय-नियोजनाची गरज, तसेच ‘स्पर्श ओळख’ या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आलं.

शिबिरात इयत्ता 8 वी ते 10 वीतील सुमारे 200 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. संवादादरम्यान एका विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करताना म्हटलं –
“आज आम्हाला समजलं की बदल नैसर्गिक आहेत, भीती नाही तर योग्य माहिती आणि आत्मविश्वास गरजेचा आहे.”

शिबिर यशस्वी होण्यासाठी मा. विघ्ने मॅडम, मा. खान मॅडम, मा. मख मॅडम आणि मा. गांजीवाले मॅडम यांचे सहकार्य लाभले.
उपस्थित मार्गदर्शकांनी विद्यार्थिनींना केवळ माहितीच नव्हे, तर आत्मविश्वास, स्वसंरक्षण आणि सशक्तीकरणाचा संदेश दिला. अशा उपक्रमांमुळे किशोरवयीन मुलींच्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

"जागृतीतूनच घडतं सुरक्षित आणि सक्षम भविष्य"

Post a Comment

0 Comments