निवे बु. (ता. देवरुख) – देवरुखजवळील युवा गणेश मित्र मंडळ निव्याच्या राजा मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच परंपरेत यंदा २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत आयुष्यमान आरोग्य मंदिर धामापूर यांच्या वतीने भव्य सामुदाय आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या, जनजागृती आणि सेवा उपक्रम घेण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. आर. रायभोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर पार पडले.
शिबिरामध्ये रक्तचाचणी, असंसर्गजन्य आजार तपासणी, किटकजन्य आजार तपासणी, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, मोतीबिंदू लाभार्थी निवड, संशयित क्षयरोग तपासणी, आयुष्यमान कार्ड जनजागृती, तसेच जलजन्य आजार तपासणी अशा विविध सेवा पुरविण्यात आल्या. भक्तगण आणि ग्रामस्थांनी या सेवांचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.
या शिबिरात डॉ. भक्ती वाजे (वैद्यकीय अधिकारी, धामापूर), डॉ. सुस्मिता भुसारी, आरोग्य सहाय्यक अशोक बोरसे व प्रशांत अहिरे, आरोग्य सहाय्यिका सौ. स्वाती गुरव व सौ. लवदे यांनी नेतृत्व केले. तसेच सामुदाय आरोग्य अधिकारी प्रसाद व्हालकर व मेघा टोंगे यांनी तपासण्या केल्या. आरोग्य सेवक-सेविका, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांनी विशेष परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले.
या शिबिराच्या माध्यमातून ग्रामीण भागात उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरवल्याबद्दल युवा गणेश मित्र मंडळ, निवे बु. यांनी समाधान व्यक्त करून सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.
0 Comments