✨ श्रीगणेशाच्या चरणी ओवीबद्ध भावांजली ✨
दिग्रस :
विदर्भाची पावन परंपरा जपणारे संतकवी ह.भ.प. हरिभाऊ शिंदे यांच्या लेखणीतून जन्मलेले ‘श्री गणेश स्तोत्र सीताबर्डी टेकडी’ या ओवीबद्ध स्तोत्राचे लोकार्पण नागपूर येथे अतिशय अध्यात्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या स्तोत्राचे थाटात विमोचन झाले.
या सोहळ्यास नागपूर येथील श्री गणेश मंदिर देवस्थान सोसायटीचे अध्यक्ष श्रीराम बापूराव कुलकर्णी, उपाध्यक्ष अरुण गोविंदराव व्यास, कोषाध्यक्ष हरि लक्ष्मण भालेराव, प्रा. डॉ. यादवकुमार मावळे, सौ. चंद्रकला ह. शिंदे, प्रा. डॉ. अनंत ह. शिंदे, सौ. रुची आनंद आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मंगलमय स्पर्श दिला.
हरिभाऊ शिंदे यांनी हे स्तोत्र रचताना “भक्ताला त्या क्षेत्राचा इतिहास व महिमा सोप्या भाषेत कळावा” हा साधा, पण गूढ उद्देश समोर ठेवला. आजच्या धावपळीच्या जीवनात मोठे ग्रंथ वाचायला वेळ नसतो, हे जाणूनच त्यांनी अगदी सहज, सरळ आणि भावपूर्ण ओव्यांच्या माध्यमातून गणेश भक्तांसाठी हे स्तोत्र साकारले आहे.
संतकवी हरिभाऊ शिंदे हे विदर्भात शीघ्र कवी आणि अध्यात्मिक लेखक म्हणून लौकिकास आलेले आहेत. त्यांनी आजवर ४६ ग्रंथ (त्यातील ३८ ओवीबद्ध स्तोत्र) तसेच अनेक गीते, पोवाडे, आरत्या, अष्टके, नामावली आणि आधुनिक पसायदानासारखी विविध लेखनसंपदा साकारली आहे. त्यांच्या लिखाणातून महाकाली, रेणुका माता, सप्तशृंगी, एकविरा, संत सेवालाल महाराज, अच्युत महाराज, नरहरीनाथ महाराज आदी देव-देवतांच्या महिमा भक्तिभावाने उजागर झाले आहेत.
त्यांच्या रचनांना प्रख्यात गायिका डॉ. नेहा राजपाल, उत्तरा केळकर व प्रज्ञा अन्नम यांसारख्या कलाकारांनी स्वरांजली दिली असून ती भक्तिमय गीते आज आकाशवाणी व युट्युबवर लोकप्रिय ठरली आहेत.
दिग्रस शहराला आध्यात्मिक ओळख मिळवून देणाऱ्या या संतकवींच्या कार्याची दखल महाराष्ट्र शासनासह विविध संस्थांनी घेऊन त्यांना आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार, विष्णुदास काव्य पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार यांसारख्या अनेक मानांनी गौरवले आहे.
या प्रकाशन सोहळ्यात “भक्ती हीच खरी शक्ती” हा संदेश अधोरेखित झाला. हरिभाऊ शिंदे यांचे लेखन केवळ शब्द नसून ते भावांजली आहे—गणेशभक्तांच्या अंतःकरणाला स्पर्श करणारी, अध्यात्माचा मार्ग उजळवणारी.
0 Comments