वाशिम पोलिसांची शिताफीची कामगिरी; नागरिकांकडून कौतुकाची लाट
वाशिम :
महामार्गांवर ट्रक थांबवून लाखो रुपयांचा माल लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्या टोळीचा भंडाफोड करून वाशिम पोलिसांनी एक मोठे ऑपरेशन यशस्वी केले आहे. समृद्धी महामार्गासह देशातील महत्त्वाच्या रस्त्यांवर सक्रिय असलेल्या या टोळीला गजाआड करताना पोलिसांनी शिताफी, तंत्रज्ञान व धाडस यांचा अद्भुत संगम दाखवला. या कारवाईमुळे वाशिम जिल्ह्याचे नाव राज्यभरात कौतुकाने घेतले जात आहे.
💊 औषधांच्या कंटेनरवर डल्ला
२३ जुलै रोजी भिवंडी येथून नागपूर–रायपूर–कोलकाता या मार्गावर जाणाऱ्या अँबोट कंपनीच्या कंटेनरवर चोरट्यांनी डल्ला मारला. चालकाच्या नकळत ट्रकचे तीन लॉक इलेक्ट्रॉनिक कटरने फोडून तब्बल २ कोटी ४३ लाख रुपयांचे औषधे चोरून नेण्यात आली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ३० जुलै रोजी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
🔍 ८५ हजार गाड्यांची तपासणी
मा. पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांना तपास सोपवण्यात आला. या पथकाने शून्य सूत्रांवर तपास सुरू करून, त्या दिवशी समृद्धी महामार्गावरून गेलेल्या तब्बल ८५ हजार गाड्यांची छाननी केली. अखेर दोन ट्रक संशयित म्हणून पुढे आले.
🕵️♂️ गुप्त पाळत आणि पाठलाग
संशयित वाहनांवर गोपनीय पाळत ठेवण्यात आली. गणेशोत्सव काळात पुन्हा चोरीच्या इराद्याने टोळी सक्रिय होणार असल्याची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी कारंजा परिसरात जाळे पसरले. समृद्धी महामार्गावर थरारक पाठलाग करून पोलिसांनी आरोपींचा ट्रक पकडला.
👮 सहा आरोपी जेरबंद
या कारवाईत अरविंद चौहान, बुरा उर्फ कुलदीप छाडी, कुनाल चौहान, अंतीम सिसोदीया, तसेच मुख्य सूत्रधार राजेंद्र चौहान व साथीदार भारत घुडावद या सहा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून ३८ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल, ट्रक, स्कॉर्पिओ गाडी व चोरीसाठी वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक कटर जप्त करण्यात आले.
🌍 महाराष्ट्र ते गुजरातपर्यंत हल्ले
या टोळीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोवा, कर्नाटक, गुजरातमध्येही अशाच पद्धतीने लाखो रुपयांच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. अजूनही चोरी गेलेल्या औषधांचा माग काढण्यासाठी वाशिमचे पोलिस पथक मध्यप्रदेशात रवाना झाले आहे.
⚖️ कोर्टीनं पोलीस कस्टडी
आरोपींना कारंजा न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. या प्रकरणातील तपास पोलीस निरीक्षक संतोष इंगळे करत असून, पुढील काही दिवसांत अजून मोठा तपास उलगडण्याची शक्यता आहे.
👏 पोलिसांचे कौतुक
या संपूर्ण कारवाईत अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल व कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. जिल्ह्यातील नागरिकांनी या धाडसी कामगिरीचे खुलेआम कौतुक केले असून, “वाशिम पोलिसांनी खरंच जनतेचा विश्वास जपला”, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
0 Comments