Ticker

6/recent/ticker-posts

"रायसोनी विद्यापीठात आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद – प्राध्यापकांसाठी तणावमुक्तीचा नवा मंत्र"

"तणावाच्या पार जिथे समाधान आहे – तिथेच खरा विकास सुरू होतो!"


     (अनिता यादव)

अमरावती, १५ सप्टेंबरजी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या संगणक अनुप्रयोग विभागाने लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेलच्या सहकार्याने ‘मन-शरीर-बुद्धी समन्वयासाठी श्वासतंत्र’ या विषयावर आयोजित केलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेंगळुरुस्थित आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे वरिष्ठ प्राध्यापक ऋषी देवव्रतजी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यशाळेत ५० हून अधिक प्राध्यापकांनी सहभाग घेत तणावमुक्तीचे व्यावहारिक मंत्र आत्मसात केले.


कार्यक्रमाची सुरुवात जोशपूर्ण योगासने, मजेशीर खेळ आणि मनःशांती प्रदान करणाऱ्या तंत्रांनी झाली. ऋषी देवव्रतजी यांनी भस्त्रिका प्राणायाम, नाडी-शोधन प्राणायाम यासारख्या प्राचीन पण परिणामकारक श्वास तंत्रांचे प्रात्यक्षिक घेतले आणि सुदर्शन क्रियेचे महत्त्व अधोरेखित केले. विशेष म्हणजे ही क्रिया आज जागतिक स्तरावर वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेली असून मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खोल परिणाम करणारी मानली जाते.

या कार्यशाळेत तणाव व चिंता कमी करणे, भावनिक समतोल राखणे, मानसिक स्पष्टता मिळवणे, नैराश्य व आघातांचा सामना करणे, अशा जीवनावश्यक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. श्वाससाधनेमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हृदय व श्वसन कार्यक्षमता सुधारते, झोपेची गुणवत्ता वाढते, तसेच तणावजन्य हार्मोन कोर्टिसॉलचे नियंत्रण साधले जाते, हेही अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमात माननीय कुलपती डॉ. विनायक देशपांडे, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट, रजिस्ट्रार डॉ. स्नेहिल जायसवाल, अधिष्ठाता डॉ. शैलेश ठाकरे, आणि संगणक अनुप्रयोग विभागप्रमुख डॉ. भवना करमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यशाळेचा समारोप करताना डॉ. स्नेहिल जायसवाल यांनी सांगितले की, "ही कार्यशाळा केवळ तणावमुक्ती साधण्यापुरती मर्यादित नाही, तर ती प्राध्यापकांच्या सर्वांगीण कल्याणाचा आणि अंतर्मुख होण्याचा मार्गही दर्शवते." प्राध्यापकांनीही याचा फार मोठा लाभ झाल्याचे उत्स्फूर्तपणे व्यक्त केले.

जी. एच. रायसोनी विद्यापीठात आयोजित अशा प्रकारच्या कार्यशाळा म्हणजे आधुनिक शिक्षण संस्थांमध्ये अध्यात्माचा समावेश करून संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाचा दिशादर्शक उपक्रम आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.


Post a Comment

0 Comments