मंगरूळपीर ( सुधाकर चौधरी)
“मळलेल्या वाटेवरून सगळेच चालतात; परंतु स्वतःची वाट घडवणारेच समाजाला दिशा देतात,” या विचारधारेतून उभ्या राहिलेल्या मधुश्रम फाउंडेशनचा दुसरा वर्धापन दिन पिंपरी-चिंचवड येथील सायन्स पार्क सभागृहात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षण, आरोग्य आणि समान संधींच्या माध्यमातून शाश्वत व सर्वसमावेशक समाजनिर्मिती करण्याच्या फाउंडेशनच्या प्रवासाला या सोहळ्याने नवी ऊर्जा दिली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. विद्या मॅडम (डायरेक्टर, राह नेक्स्ट स्किल्स फाउंडेशन), संतोष शिरसेकर (सीएसआर टीम लीडर, यारदी सॉफ्टवेअर इंडिया प्रा. लि.), डॉ. सोमनाथ शिनगारे (बिझनेस कोच), शितल बंडगर (बार्टी प्रकल्प अधिकारी), रितेश कुमार (सीएफपी), प्रमोद बडीगेर (प्रमाणित न्यूट्रिशनिस्ट) तसेच के. टी. मुंजे (संचालक, मधुश्रम फाउंडेशन) यांनी आपली उपस्थिती नोंदवत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
फाउंडेशनचे संचालक अमोल मुजे यांनी प्रास्ताविकात संस्थेची वाटचाल, ध्येयधोरणे आणि भावी संकल्पना स्पष्ट केल्या. “काळाची पावले ओळखून समाजाच्या गरजांनुसार काम केले, तर यश निश्चित आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमातील एक भावनिक क्षण म्हणजे एलजीबीटीक्यू अॅक्टिव्हिस्ट संगीता तांबे यांनी व्यक्त केलेल्या भावना. “समाजाच्या मुख्य प्रवाहात आम्हालाही स्थान मिळावे, हीच अपेक्षा असते. अमोल सरांनी आमची दखल घेतली, हे आमच्यासाठी सन्मानाचे आहे,” असे सांगत त्यांनी फाउंडेशनच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे कौतुक केले. विविध स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या सदस्यांची लक्षणीय उपस्थिती या वेळी दिसून आली.
सभागृहाबाहेर उभारण्यात आलेल्या विविध स्टॉल्सनी कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. महेंद्र पांगारकर यांनी साकारलेले वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित कॅलेंडर विशेष आकर्षण ठरले. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच, एलजीबीटीक्यू समुदायाने तयार केलेल्या कपड्यांचे विक्री स्टॉल, तर प्रमोद बडीगेर यांचा संतुलित आहाराविषयी मार्गदर्शन करणारा स्टॉल उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता.
या यशस्वी आयोजनासाठी उमेश मृगजले, सागर मोरे, पंकज ढगे, सूरज गायकवाड तसेच बार्टी प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रज्ञा यादव यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली, तर अमित अमृतकर यांनी रिटर्न गिफ्ट व स्टॅन्डी व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.
समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार करत, मधुश्रम फाउंडेशनने समाजाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा ‘स्व-वाट’ संकल्प या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अधिक ठामपणे अधोरेखित केला.
0 Comments