— आजचा लेख त्यांच्या चरणी समर्पित
महाराष्ट्राच्या समाजसुधारणेच्या इतिहासात गाडगे महाराज यांचे कार्य अनन्यसाधारण व प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी आयुष्यभर समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद, अस्वच्छता व दारिद्र्य यांविरुद्ध अखंड लढा दिला. “देव शोधायचा असेल तर माणसात देव शोधायचा असतो” हा त्यांचा संदेश केवळ उपदेश नव्हता, तर कृतीतून साकार झालेला मानवतावाद होता.
गाडगे महाराजांनी कर्मकांडापेक्षा कर्माला महत्त्व दिले त्यांनी गावातील रस्ते, चावड्या, धर्मशाळा, विहिरी आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता केली. हातात झाडू घेऊन स्वतः स्वच्छता करत त्यांनी लोकांना कृतीतून शिकवले. स्वच्छता ही फक्त आरोग्याशी संबंधित बाब नसून ती सामाजिक जाणीव आणि जबाबदारी आहे, हे त्यांनी समाजमनावर बिंबवले.
त्यांचे प्रबोधन हे सर्वसामान्य माणसासाठी होते. जात-पात, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब असे भेद त्यांनी मानले नाहीत. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार शक्य नाही, हे ओळखून त्यांनी मिळालेल्या दानधर्माचा उपयोग शिक्षणसंस्था, वसतिगृहे, धर्मशाळा आणि गरिबांच्या मदतीसाठी केला. त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू माणूस आणि माणुसकी हाच होता.
गावोगावी फिरताना कीर्तन, भजन आणि थेट संवादातून त्यांनी समाज जागृत केला. दारू, व्यसनाधीनता, अस्वच्छ सवयी यांना त्यांनी कठोर विरोध केला. त्यांचा साधा वेष, निर्मळ जीवन आणि निर्भीड विचार यामुळे ते जनसामान्यांचे खरे संत बनले. समाजसुधारणा म्हणजे केवळ भाषणे नव्हेत, तर प्रत्यक्ष कृती असते, हे त्यांनी आयुष्यभर दाखवून दिले.
आजच्या आधुनिक युगात स्वच्छता, सामाजिक समता, बंधुता आणि मानवतावाद यांची नितांत गरज आहे. “स्वच्छ भारत”सारख्या उपक्रमांच्या मुळाशी गाडगे महाराजांच्या विचारांचे प्रतिबिंब दिसते. त्यांनी दिलेला स्वच्छतेचा मूलमंत्र, कर्मप्रधान धर्माची शिकवण आणि माणुसकीचा संदेश आजही तितकाच कालसुसंगत आहे.
गाडगे महाराजांचे विचार केवळ स्मरणात ठेवून नव्हे, तर आचरणात आणूनच त्यांना खरी आदरांजली देता येईल. स्वच्छ, सुसंस्कृत, समतावादी आणि मानवतावादी समाज घडवणे, हीच त्यांच्या चरणी खरी सेवा ठरेल.
✍️ लेखक : सुधाकर चौधरी
0 Comments