Ticker

6/recent/ticker-posts

श्री धानोरकर आदर्श विद्यालयात माती परीक्षण कार्यशाळा संपन्न


धानोरा खुर्द (वार्ताहर):
धानोरा खुर्द येथील श्री धानोरकर आदर्श विद्यालयात फाली (Future Agriculture Leaders of India) या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी माती परीक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला.


या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातील मातीचे नमुने आणून प्रत्यक्ष माती परीक्षण केले. यावेळी मातीचा सामू (pH), नत्र, स्फुरद, पालाश आदी घटकांची तपासणी करण्यात आली. माती परीक्षणाची गरज व त्याचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. एम. एन. धानोरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माध्यमिक शिक्षण घेत असतानाच कृषीविषयक मूलभूत ज्ञान आत्मसात करण्याचे महत्त्व सांगितले. भविष्यात शेती कशी करावी तसेच शेती व शेती व्यवसायाकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कृषी शिक्षक श्री. सुदेश हिवराळे यांनी माती परीक्षणाचे शास्त्रीय महत्त्व स्पष्ट करताना प्रत्येक पिकासाठी मातीतील घटकांचे योग्य प्रमाण किती असावे, याची माहिती दिली. अयोग्य प्रमाणात खतांचा वापर झाल्यास शेतजमीन व पिकांचे होणारे नुकसान कसे टाळता येईल, यावर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच मातीचा नमुना कसा घ्यावा व त्याची चाचणी कशी करावी, याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले.

कार्यक्रमास पर्यवेक्षक सौ. ए. एम. धानोरकर मॅडम, श्री. उचित सर, श्री. सावके सर, श्री. सी. जे. झळके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


Post a Comment

0 Comments