शालेय परिसर स्वच्छतेसह प्रबोधनपर उपक्रम
धानोरा खुर्द (वार्ताहर) :
येथील श्री धानोरकर आदर्श विद्यालय येथे थोर संत व समाजसुधारक यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त विद्यार्थ्यांनी शालेय परिसराची स्वच्छता करून संत गाडगेबाबांच्या स्वच्छतेच्या विचारांचा प्रत्यक्ष कृतीतून संदेश दिला.
कार्यक्रमात दहावीचा विद्यार्थी गजेंद्र मुंजे याने संत गाडगेबाबांची वेशभूषा परिधान करून स्वच्छता केली. यावेळी त्याने गाडगेबाबांचे कीर्तन सादर करत शिक्षणाचे महत्त्व विशद केले. तसेच नववीतील विद्यार्थिनी कु. अमिषा भगत हिने संत गाडगेबाबांच्या समाजकार्यावर आपले विचार प्रभावीपणे मांडले.
विद्यालयाचे प्राचार्य मा. मंगेशभाऊ धानोरकर यांनी अध्यक्षीय भाषणात संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश सविस्तरपणे स्पष्ट केला.
“भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्त्र, गरीब व गरजूंसाठी शिक्षण, आजारी व अपंगांसाठी उपचार, बेघरांसाठी आसरा, बेरोजगारांसाठी रोजगार, पशु-पक्ष्यांसाठी अभय, गरीब तरुण-तरुणींच्या विवाहास मदत आणि दुःखी-निराशांना धैर्य देणे—हाच खरा धर्म व खरी भक्ती आहे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी गाडगेबाबांच्या भजनात तल्लीन होत आनंदात स्वच्छता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. उचित सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments