Ticker

6/recent/ticker-posts

संविधानिक मूल्यांची मशाल पेटली; गोळेश्वर येथे ‘साऊ ते जिजाऊ’ महोत्सवातून महिलांमध्ये जनजागृती


गोळेश्वर (ता. कराड) :
समाज परिवर्तनाची दिशा दाखवणाऱ्या संविधानिक मूल्यांची प्रभावी मांडणी करत गोळेश्वर येथे ‘साऊ ते जिजाऊ’ महोत्सव उत्साहात साजरा झाला. ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था यांच्या वतीने आयोजित या महोत्सवानिमित्त झालेल्या व्याख्यानातून महिलांमध्ये संविधानिक मूल्यांबाबत जागृती करण्यात आली.

या कार्यक्रमात विंग प्रक्रिया फेलो शितल कुंभार यांनी उपस्थित महिलांशी थेट संवाद साधत संविधानाचे महत्त्व, हक्क-कर्तव्ये आणि दैनंदिन जीवनात संविधान कसे जगावे यावर सखोल मार्गदर्शन केले. संविधान ही केवळ पुस्तकी संहिता नसून ती प्रत्येक नागरिकाच्या रोजच्या वागण्यातून प्रतिबिंबित झाली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत काशिद, ग्रामपंचायत सदस्य विद्या वाघ, मंगल देशमुख, ग्रामपंचायत स्तरावरील विविध समित्यांचे सदस्य तसेच बचत गटातील महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शितल कुंभार म्हणाल्या, “ज्ञानदीप संस्थेच्या माध्यमातून मधुराणी थोरात यांनी संविधानिक मूल्यांची जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. राजमाता जिजाऊ आणि क्रांतिसूर्य सावित्रीबाई फुले (साऊ) यांच्या विचारांचा, कार्याचा आणि समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा महोत्सव काही वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे.”

व्याख्यानादरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यासह देशातील महान महिला नेतृत्वाने समाज परिवर्तनाच्या चळवळीत दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकण्यात आला. स्त्री शिक्षण, स्वाभिमान, समानता आणि न्याय या मूल्यांची सांगड संविधानाशी घालत उपस्थित महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्नेहल गायकवाड यांनी स्वागत केले, तर माधुरी शिंदे यांनी आभार मानले. संविधानिक मूल्यांची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम महिलांसाठी प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

0 Comments