भुसावळ | प्रतिनिधी
अत्यंत साधेपणा, अपार कष्ट, निष्ठा आणि सेवाभाव यांच्या जोरावर असामान्य उंची गाठणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी! भुसावळ येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवाणी फाउंडेशनचे अध्यक्ष असलेल्या प्रा. डॉ. ललवाणी यांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वर्ल्ड सेवन वंडर्स संस्थेतर्फे ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान करून त्यांच्या बहुआयामी कार्याचा सन्मान करण्यात आला.
नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित २३ व्या अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलनाच्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या ज्ञान, साहित्य, कला व क्रीडा महोत्सवात देशभरातून विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यिक, कलाकार, समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात, हजारो उपस्थितांमधून एकमेव व्यक्ती म्हणून प्रा. डॉ. ललवाणी यांची निवड ही त्यांच्या कार्याची पावती ठरली.
या प्रसंगी प्रमुख आयोजक ॲड. डॉ. क्रांती महाजन यांनी गौरवोद्गार काढताना सांगितले की, “अत्यंत संघर्षशील जीवन, दिलेला शब्द कायम पाळणारी वृत्ती, अहोरात्र मेहनत आणि कोणताही अभिनिवेश न बाळगता स्वतःला नेहमी सामान्य समजणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी. असामान्य असूनही सामान्यपणात रमणारे हे व्यक्तिमत्व आजच्या पिढीसाठी प्रेरणास्थान आहे.”
अत्यंत गरिबीच्या परिस्थितीतून संघर्ष करत, प्रामाणिकपणा व निष्ठेच्या बळावर त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले. सेवेतून निवृत्तीनंतर आलेल्या असह्य धक्क्यांवर मात करत त्यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेतली. शेतकरी, गोसेवक, उद्योजक अशा विविध भूमिका पार पाडत त्यांनी एका छोट्याशा गावात जंगलातून नंदनवन उभारले. निसर्ग, प्राणी, पक्षी यांच्याशी एकरूप झालेली त्यांची दिनचर्या आजही निस्वार्थ सेवाभावाचे दर्शन घडवते. “रिटायर्ड झाले तरी टायर्ड नाही, सदैव रिस्टँड-अप” अशी त्यांची ओळख आहे.
हा पुरस्कार श्रीमंत मुधोजीराजे भोसले, नागपूरच्या भोसले राजघराण्याचे वारसदार, सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील सक्रिय योद्धे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर सेनानी तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे यांच्या करस्पर्शाने हा सन्मान अधिकच प्रेरणादायी ठरला. या दोन महनीयांच्या उपस्थितीत सोहळा अविस्मरणीय बनला.
या दिमाखदार सोहळ्यास सेवानिवृत्त प्रा. डॉ. पंढरीनाथ रोकडे, अग्रसेन युनिव्हर्सिटी (वाराणसी) येथील प्राध्यापक तथा भारत सुंदरी २०२५ श्रीमती रुपाली वशिष्ठ, हिंदुस्तान स्काऊट गाईडचे राष्ट्रीय संचालक डॉ. राकेशकुमार मिश्रा (रायपूर), उत्तर प्रदेशचे सांस्कृतिक मंत्री यशवंत निकोसे, डॉ. प्रदीप टंडन, उद्योजक राजाभाऊ उंबरकर, पंचायत राज अभियानाचे राष्ट्रीय प्रवर्तक दयाराम रॉय, साहित्यकार टी. बी. चंद्रसुब्बा (सिक्कीम), पंजाबी कलाकार युधिष्ठिर राणा, शिवयोगी स्वामी कृष्णकांत महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“बत्तीस वर्षांच्या शैक्षणिक सेवेच्या मेहनतीचे फळ, सामाजिक कार्याची पावती आणि संघर्षमय जीवनाची सफलता म्हणजे हा जीवन गौरव पुरस्कार,” अशा भावस्पर्शी शब्दांत प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांनी आयोजक ॲड. डॉ. क्रांती महाजन व संपूर्ण टीमचे आभार मानले. हा पुरस्कार पुढील सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा देणारा असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागपूरच्या या भव्य संमेलनात प्रतिभेचा महासागर उसळला, इतिहास जागला आणि समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव होत असताना, प्रा. डॉ. डी. एम. ललवाणी यांचा जीवनप्रवास अनेकांसाठी दीपस्तंभ ठरला.
0 Comments