अकोला :
जगाला वैचारिक तेज देणारे महायोगी स्वामी विवेकानंद आणि स्वराज्य संकल्पनेची आद्य प्रेरणा देणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारांची जननी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त “भव्य व प्रेरणादायी पुरस्कार वितरण सोहळा – २०२६” चे आयोजन सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी खडकी (अकोला) येथे करण्यात आले आहे. विचार, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम असलेला हा सोहळा राष्ट्रीय पातळीवर समाजघडणीस वाहिलेल्या कार्याचा गौरव करणारा ठरणार आहे.
हा कार्यक्रम अखिल भारतीय मराठा सेवा संघ, डी.एम.के. सेवा मंडळ आणि निर्भय बनो जनआंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला असून, समाजहितासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांचा राजमाता जिजाऊ पुरस्कार व स्वामी विवेकानंद पुरस्कार देऊन यथोचित सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाचे दीपस्तंभ ह.भ.प. श्री वासुदेवराव महल्ले महाराज (अध्यक्ष – श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, अकोट) विराजमान राहणार असून, त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे सोहळ्याला वैचारिक अधिष्ठान लाभणार आहे. राजमाता जिजाऊ पुरस्कार माजी प्राचार्य सौ. प्रतिभा सुभाषराव पाथ्रीकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. यामध्ये वामनरावजी भिलारे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठा सेवा संघ), मा. हनुमंत शेळके (राज्य उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा सेवा संघ), मा. प्रकाश पोहरे (राष्ट्रीय अध्यक्ष, किसान ब्रिगेड), दिलीप अंधारे (माजी अध्यक्ष, साने गुरुजी शिक्षक पतसंस्था, अकोला), धनंजय मिश्रा (प्रवक्ता, किसान ब्रिगेड), दिवाकर गावंडे (जिल्हाध्यक्ष, किसान ब्रिगेड, अकोला) तसेच तात्यासाहेब मोरे (सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर) यांचा समावेश आहे.
हा भव्य सोहळा हॉटेल मैत्री, खडकी–चांदूर बायपास राज्यमहामार्गालगत, खडकी, अकोला येथे सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. दादाराव पाथ्रीकर (राष्ट्रीय संघटक, अखिल भारतीय मराठा सेवा संघ) आणि श्री. गजानन हरणे (राज्य उपाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा सेवा संघ) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी विचार आणि राजमाता जिजाऊंचे संस्कार समाजमनात रुजवणारा हा जयंती सोहळा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता, सामाजिक जाणीव जागवणारा वैचारिक उत्सव ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून या प्रेरणादायी सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments