शेतीच्या कामासाठी लाच मागणे भोवले – १० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
मंगरूळपीर | प्रतिनिधी
सामान्य शेतकऱ्यांना गृहीत धरून “कामाशिवाय पैसा नाही” अशी वसुलीशाही राबवणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याचा अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला आहे. आईच्या नावावरील शेतजमीन तक्रारदाराच्या नावावर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
प्रकरण असे की, मंगरूळपीर येथील एका ४७ वर्षीय तक्रारदाराकडून महसूल नोंद दुरुस्तीसाठी थेट लाच मागितली जात होती. शेतजमीन नावावर करण्यासाठी शासकीय प्रक्रिया असूनही संबंधित अधिकाऱ्याने पैशांची मागणी करून शेतकऱ्याला मानसिक त्रास दिला. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर १५ जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून १०,००० रुपये स्वीकारताच अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. अंगझडतीत लाचेची रक्कम, रोख पैसे व मोबाईल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये मंगरूळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
जनतेत संताप – “हा अधिकारी वसुलीचा बादशाह”
या अधिकाऱ्याविरोधात जनसामान्यात आधीपासूनच तीव्र नाराजी होती.
कामासाठी थेट धमक्या देणे, अडवणूक करणे, वसुलीशैलीने नागरिकांना झुकवणे ही त्याची नेहमीची पद्धत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. “काम हवे असेल तर पैसे द्या, नाहीतर फेऱ्या मारा” अशी दबावाची भूमिका हा अधिकारी घेत असल्याचे बोलले जात होते.
प्रशासनाची कसोटी
एकीकडे शासन ‘भ्रष्टाचारमुक्त प्रशासन’चा नारा देत असताना, दुसरीकडे अशा घटना प्रशासनाच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या ठरत आहेत. या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला असून, जनतेत समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम यांच्या पथकाने केली असून, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती बापू बांगर तसेच अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली. प्रत्यक्ष सापळा कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक अलका गायकवाड (ला.प्र.वि., वाशिम) यांनी केले. तर उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश परदेशी यांनी पर्यवेक्षण केले. या कारवाईत नितीन टवलारकर, विनोद अवगळे, योगेश खोटे, महेश परमेश्वरे, नाविद शेख, मंगेश देवकते यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या तक्रारदाराचे धैर्य कौतुकास्पद असून, अशा अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
0 Comments