Ticker

6/recent/ticker-posts

“हा स्वाभिमानाचा लढा! ठाकरे मार्गदर्शनात महिला संघटना आंदोलनाच्या तयारीत”



मंगरूळपीर तालुका हादरला – महिला संघटना आक्रमक, जिल्हाभर आंदोलनाचा इशारा

मंगरूळपीर (जि. वाशिम) | प्रतिनिधी

मनरेगा योजनेंतर्गत मिळणाऱ्या हक्काच्या अनुदानाची मागणी करणे शेतकऱ्याला महागात पडले असून, तालुका कृषी अधिकाऱ्याने थेट शेतात जाऊन शेतकऱ्याला बुटाने मारहाण केल्याची संतापजनक घटना गोगरी येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका नव्हे तर जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे.

गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी मनरेगा अंतर्गत १.२० हेक्टर क्षेत्रावर संत्रा फळबाग लागवड केली आहे. मात्र चार महिन्यांपासून फळबाग अनुदान व मस्टरचे पैसे जाणीवपूर्वक रोखून धरले गेले. पवार यांच्यासह सुमारे १५ शेतकरी कृषी कार्यालयात सातत्याने चकरा मारत होते. लेखी अर्ज, तोंडी विनंत्या, फोन—सर्व करूनही प्रशासनाकडून केवळ टोलवाटोलवीच मिळत होती.

या अन्यायाविरोधात आवाज उठविल्यामुळे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी थेट शेतात जाऊन शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असा गंभीर आरोप आहे.
शेतकऱ्याला बुटाने मारणे म्हणजे त्याला माणूस म्हणून नाकारणे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

या अमानुष घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मात्र इतका गंभीर प्रकार घडूनही प्रशासनाकडून कोणतीही तात्काळ कारवाई न झाल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाचे हे मौन म्हणजे दोषींना पाठीशी घालण्याचा प्रकार असल्याची तीव्र जनभावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, माजी राज्यमंत्री सुभाषरावजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस वाशिम जिल्हा कार्याध्यक्ष ज्योतीताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महिला संघटना आक्रमक झाली आहे.
“ही लढाई एका शेतकऱ्याची नसून संपूर्ण शेतकरी समाजाच्या स्वाभिमानाची आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू,” असा इशारा देण्यात आला आहे.

महिला संघटनेच्या ठाम मागण्या :

  • तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्यावर तात्काळ गंभीर गुन्हे दाखल करावेत
  • संबंधित अधिकाऱ्याला त्वरित निलंबित करावे
  • प्रलंबित फळबाग अनुदान व मस्टरचे पैसे तात्काळ अदा करावेत
  • या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून उदाहरणार्थ कारवाई करावी

जर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही, तर महिला संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन, रास्ता रोको व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

या घटनेमुळे एकच प्रश्न उपस्थित झाला आहे—
“आज शेतकऱ्याला बुटाने मारले जातेय, उद्या सामान्य नागरिक सुरक्षित आहे का?”


Post a Comment

0 Comments