Ticker

6/recent/ticker-posts

कुत्र्यांच्या नसबंदी प्रकरणाने मंगरूळपीर हादरले

नसबंदीच्या नावाखाली अमानुषता!हे कुत्रे मुकं आहेत… पण अन्याय ओरडतोय — त्यांना न्याय मिळेल का?”


नगरसेवक अनिल गावंडेंचा पर्दाफाश;नगराध्यक्ष अशोक भाऊ परळीकरांची घटनास्थळी पाहणीऑडिओ–फोटो व्हायरल, प्रशासनावर कारवाईचा दबाव

“हा विकास आहे की निर्दयपणा?नसबंदी नंतर उपाशी ठेवलेल्या कुत्र्यांचा दोषी कोण?”


मंगरूळपीर | शहरात भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीच्या नावाखाली झालेल्या कथित अमानुष प्रकारामुळे मंगरूळपीर नगरपरिषद खळबळून गेली आहे. या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश नवनिर्वाचित नगरसेवक अनिल गावंडे यांनी केला असून, त्यांनी हा संपूर्ण प्रकार थेट प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने नगरपरिषद व संबंधित यंत्रणा अडचणीत सापडल्या आहेत.

कुत्र्यांची नसबंदी करताना नियमांची पायमल्ली करून थातूरमातूर शस्त्रक्रिया, त्यानंतर अन्न-पाणी व उपचारांशिवाय कुत्र्यांना बंदिस्त करून ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिक व प्राणीमित्रांकडून केला जात आहे. या प्रकारामुळे काही कुत्र्यांची प्रकृती खालावल्याचेही सांगण्यात येत असून, हा प्रकार म्हणजे प्राणी कल्याण कायद्याचा उघड भंग असल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक भाऊ परळीकर यांनी नगरसेवक अनिल गावंडे यांच्यासोबत घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यानचे ऑडिओ क्लिप्स आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, त्यामधून परिस्थितीची गंभीरता स्पष्टपणे समोर येत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

नागरिकांच्या मते, नसबंदी ही समस्या सोडवण्याची उपाययोजना असू शकते; मात्र ती अमानुषतेचं साधन बनू नये. नियमांनुसार शस्त्रक्रियेनंतर कुत्र्यांना वैद्यकीय उपचार, निरीक्षण, पुरेसं अन्न-पाणी आणि सुरक्षित वातावरण देणं बंधनकारक आहे. मात्र मंगरूळपीरमध्ये हे सर्व नियम पायदळी तुडवल्याचा आरोप होत आहे.

या संपूर्ण प्रकरणात नसबंदीची जबाबदारी कोणत्या संस्थेकडे देण्यात आली होती, त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण होतं, पशुवैद्यकीय देखरेख होती की नाही, याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे, कुत्र्यांना उपाशी कोंडून ठेवण्याचा निर्णय कोणी आणि कोणत्या अधिकारात घेतला, याचंही उत्तर अद्याप मिळालेलं नाही.

नगरसेवक अनिल गावंडे यांनी हा प्रकार उघडकीस आणून प्रशासनाच्या निदर्शनास आणल्यानंतर शहरात चर्चेला उधाण आलं आहे. दोषी संस्था, ठेकेदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी जनसामान्य, प्राणीमित्र संघटना आणि सुजाण नागरिकांकडून होत आहे.

स्वच्छता, डासांचा प्रादुर्भाव, आरोग्य सेवा अशा अनेक प्रश्नांनी आधीच त्रस्त असलेल्या मंगरूळपीर शहरात, कुत्र्यांच्या नसबंदीतील कथित अमानुषतेमुळे नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांचा रोष आंदोलनाच्या रूपाने व्यक्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Post a Comment

0 Comments