“तक्रार केल्याचा ‘गुन्हा’! फळबाग योजनेच्या पैशांसाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याची जोड्याने मारहाण
मंगरूळपीर | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी नियुक्त केलेले अधिकारीच जर शेतकऱ्यांवर हात उगारत असतील, तर न्याय मागायचा कुणाकडे? असा संतप्त सवाल गोगरी (ता. मंगरूळपीर) येथील घटनेनंतर उपस्थित झाला आहे.
फळबाग योजनेअंतर्गत केलेल्या कामाचे मस्टरचे पैसे अद्याप मिळाले नसल्याने गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी काल थेट जिल्हा कृषी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचा राग मनात धरून आज तालुका कृषी अधिकारी कांबळे हे गोगरी गावात आले असता, त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शेतकरी ऋषिकेश पवार याला सरळ मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
तक्रार केल्याचा “गुन्हा” केल्यामुळे शेतकऱ्याला धमकावून मारहाण करण्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्याच्या मुजोरीचा हा प्रकार असल्याची चर्चा शेतकरी व नागरिकांमध्ये सुरू आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का, असा सवाल जनसामान्यातून विचारला जात आहे.
कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार?
शेतकरी ऋषिकेश पवार यांनी मारहाण करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्यावर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यावर निलंबन, गुन्हा दाखल किंवा चौकशी होणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जनसामान्यातून संतप्त प्रतिक्रिया
“शेतकऱ्यांनी तक्रार केली म्हणून मारहाण होत असेल, तर उद्या शेतकरी तोंड उघडायलाच घाबरणार,” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
“अशा अधिकाऱ्यांना जर संरक्षण दिले गेले, तर प्रशासनही तितकेच दोषी ठरेल,” असेही नागरिकांचे मत आहे.
आता प्रश्न एकच आहे—
शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर प्रशासन खरोखर कारवाई करणार की पुन्हा एकदा शेतकऱ्यालाच न्याय नाकारला जाणार?
0 Comments