Ticker

6/recent/ticker-posts

“अन्नदात्याला मारहाण, अधिकारी माजले!निलंबन नाही तर आंदोलन—राष्ट्रवादीचा इशारा”


शेतकऱ्याला न्याय द्या!

कृषी अधिकाऱ्याच्या मारहाणीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक
— गुन्हा दाखल व निलंबनाची ठाम मागणी

मंगरुळपीर | सुधाकर चौधरी

मनरेगा अंतर्गत अनुदान मागणाऱ्या शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्याविरोधात मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे. संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी, मंगरुळपीर यांना सणसणीत निवेदन सादर करण्यात आले.

निवेदन सादर करताना उपस्थित नेतृत्व

हे निवेदन आर. के. राठोड (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी
रवि पाटील राऊत (जिल्हा उपाध्यक्ष),
राम प्र. सुर्वे (तालुका अध्यक्ष),
मुकेश मुंजे (तालुका कार्याध्यक्ष),
देवानंद जावळे (तालुका उपाध्यक्ष),
सुरज पाटील ठाकरे,
विनोद पाटील चौधरी,
राहुल जाधव,
रोहीदास चव्हाण,
बळीराम पवार,
गणेश पवार (मा. पं. स. सदस्य),
पंकज पाटील इंगोले,
ज्ञानेश्वर राठोड,
मुस्ताक फकीरावाले,
साबीर फकीरावाले,
हरिचंद्र राठोड (दामा),
वसंत राणेड (वसंतवाडी),
प्रविण वसुदेव राठोड,
ज्ञानेश्वर रानड (दामा),
अशोक जामनिक,
भास्कर इंगळे,
निखिल गळवे,
रहेमान फकीरावाले,
मुसाभाई फकीरावाले

यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

नेमकं प्रकरण काय?

गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी मनरेगा अंतर्गत १.२० हेक्टर क्षेत्रावर संत्रा बाग लागवड केली. मात्र गेल्या चार महिन्यांपासून फळबागेचे अनुदान व मस्टरचे पैसे मिळालेले नाहीत. यासाठी गावातील सुमारे १५ फळबाग उत्पादक शेतकरी वारंवार कृषी कार्यालयात चकरा मारत होते. जिल्हा कृषी अधिकारी, वाशिम यांच्याकडे लेखी व दूरध्वनीद्वारे तक्रारी करूनही केवळ उडवा–उडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप आहे.

याच रागातून तालुका कृषी अधिकारी थेट गोगरी गावात जाऊन शेतकरी ऋषिकेश पवार यांच्या शेतात गेले आणि त्यांना धक्काबुक्की, बुटाने मारहाण तसेच मातीचे ढेकळे व दगडाने बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निलंबन नाही तर आंदोलन!

“शेतकरी हा अन्नदाता आहे, गुन्हेगार नाही. शेतकऱ्यावर हात उचलणारा अधिकारी पदावर राहू शकत नाही,” असा ठाम इशारा राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी दिला. तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई न झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, आणि भविष्यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला.

हे निवेदन मा. जिल्हाधिकारी वाशिम, मा. जिल्हा कृषी अधिकारी वाशिम व पोलीस स्टेशन मंगरुळपीर यांना प्रतिलिपी देऊन सादर करण्यात आले आहे.
आता प्रशासन शेतकऱ्याच्या बाजूने ठोस भूमिका घेते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments