मंगरूळपीर | दि. २८ फेब्रुवारी २०२६
शहरातील वाढत्या घाणीविरोधात नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अनिल विठ्ठलराव गावंडे यांनी छेडलेले गांधीगिरी आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. मंगरूळपीर नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात त्यांनी नगरपरिषद आवारात स्वतःच्या खुर्चीवर घनकचरा ठेवून जाहीर निषेध नोंदवला.
“जोपर्यंत शहराची संपूर्ण साफसफाई होत नाही, तोपर्यंत मी या खुर्चीवर बसणार नाही!” असा ठाम इशारा उपनगराध्यक्ष अनिल गावंडे यांनी दिला आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रशासनाला जाग आणण्यासाठीच हे आंदोलन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संत गजानन महाराज हुडको कॉलनीत बिकट स्थिती
शहरातील संत गजानन महाराज हुडको कॉलनी परिसरात तर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दारूबंदी लगतच्या मोकळ्या जागेत मोठा कचऱ्याचा ढिगारा साचलेला असून दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नाल्या तुंबलेल्या, मुख्य रस्त्यांवर कचरा आणि अनेक दिवस घंटागाडी न आल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
“कर वसुलीत आघाडी, सुविधा मात्र शून्य!”
नगरपरिषदेकडून सर्व प्रकारचे कर नियमित वसूल केले जातात; मात्र स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे.
“नगरपरिषद कर्जमाकरण्यात व्यस्त; पण शहर घाणीने व्याप्त!” असा संतप्त सूर नागरिकांतून उमटत आहे.घंटागाड्या बंद, शहर बेहाल
संपूर्ण शहरासाठी आवश्यक असलेल्या घंटागाड्यांपैकी केवळ १ ते ३ गाड्या सुरू असल्याने अनेक प्रभागांत ५–७ दिवस कचरा उचलला जात नाही. घराघरात घनकचरा साचून राहिल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
गांधीगिरीआंदोलन सुरूच
उपनगराध्यक्ष अनिल गावंडे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही खुर्ची सत्तेची नसून जबाबदारीची आहे. शहर स्वच्छ झाल्याशिवाय मी या खुर्चीवर बसणार नाही.”
या आंदोलनाची प्रत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महाराष्ट्र शासन नगर विकास मंत्रालय यांना पाठवण्यात आली आहे.
मंगरूळपीरकरांचा संतप्त सवाल —
“घाणीने व्यापलेले शहर आणि शांत प्रशासन… आता तरी जाग येणार का?”
0 Comments