मंगरूळपीर (जि. वाशिम), दि. 28 फेब्रुवारी 2026 :
मंगरूळपीर नगरपरिषद येथे स्वच्छतेच्या प्रश्नावरून तीव्र संताप उसळला असून उपनगराध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल विठ्ठलराव गावंडे यांनी थेट गांधीगिरी आंदोलनाचा मार्ग अवलंबत नगरपरिषद आवारातच घनकचरा आणून जाहीर निषेध नोंदविला.
नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल एक महिना उलटूनही स्वतंत्र कार्यालयाची व्यवस्था न झाल्याचा आरोप करत गावंडे यांनी प्रशासनावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. “कार्यालय नसल्याने जनतेची कामे प्रलंबित आहेत, तर शहरात साफसफाईचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे,” असा संतप्त सूर त्यांनी व्यक्त केला.
शहरात घाणीचे साम्राज्य
शहरातील अनेक प्रभागांमध्ये नाल्यांची साफसफाई ठप्प असून मुख्य रस्त्यांवरील कचरा दिवसेंदिवस साचत आहे. घंटागाड्यांची संख्या अत्यल्प असल्यामुळे काही प्रभागांत पाच ते सात दिवसांनीच कचरा संकलन होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिणामी घरगुती घनकचरा मोठ्या प्रमाणात साचून दुर्गंधी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असताना शहरात योग्य साफसफाई न होणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे गावंडे यांनी नमूद केले. “थातूरमातूर कामे करून प्रशासन जबाबदारी झटकत आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
“घंटागाड्या कुठे गायब?”
संपूर्ण शहरासाठी आवश्यक असलेल्या घंटागाड्यांपैकी केवळ एक ते तीनच कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला. उर्वरित वाहनांची दुरवस्था किंवा बिघाडामुळे सेवा ठप्प असल्याने शहरातील कचरा संकलन व्यवस्था कोलमडल्याचे चित्र आहे.
नगरपरिषदेकडे येणारा महसूल नेमका कुठे खर्च झाला, स्वच्छतेसाठीची तरतूद कोठे वापरली गेली, याबाबत मुख्य प्रशासनाने पारदर्शकता दाखवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
गांधीगिरीचा अनोखा निषेध
परिस्थितीचा निषेध म्हणून उपनगराध्यक्षांनी स्वतःच्या खुर्चीवरच शहरातील घनकचरा ठेवून प्रतीकात्मक आंदोलन केले. नगरपरिषद आवारात हा प्रकार घडताच नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली.
“शहर स्वच्छ ठेवा, जनतेला दिलासा द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा देत गावंडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना तात्काळ नवीन घंटागाड्या खरेदी करून शहरातील साफसफाई सुरळीत करण्याचे आवाहन केले.
प्रशासनाला निवेदन
या संदर्भात प्रतिलिपी जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम तसेच नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांना पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मंगरूळपीर शहरात स्वच्छतेच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या या घडामोडींमुळे प्रशासनाची झोप उडाली असून पुढील काही दिवसांत काय निर्णय घेतला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
0 Comments