Ticker

6/recent/ticker-posts

मंगरूळपीर येथील म्हाडा प्रकरणी न्यायासाठी आमरण उपोषण सुरू; सुधाकर चौधरी यांचा आक्रमक पवित्रा


अमरावती, दि. ९ मार्च – मंगरूळपीर येथील म्हाडा प्रकल्पातील गाळा क्रमांक एम.आय.जी. ६४ व गाळा क्रमांक २२ संदर्भातील अतिक्रमण, खोट्या तक्रारी व मानसिक छळाच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा आरोप करत अण्णा हजारे प्रणित राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासाचे वाशिम जिल्हाध्यक्ष सुधाकर शेषराव चौधरी यांनी आजपासून विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
सुधाकर चौधरी यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, मंगरूळपीर येथील म्हाडा योजनेतील गाळ्यांबाबत बेकायदेशीर बांधकाम, अतिक्रमण तसेच काही व्यक्तींनी सातत्याने खोट्या तक्रारी करून प्रशासनाची दिशाभूल केल्याची बाब त्यांनी अनेक वेळा लेखी तक्रारी आणि निवेदनांद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र संबंधित प्रकरणात आजपर्यंत कोणतीही ठोस व समाधानकारक कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
याच पार्श्वभूमीवर न्याय मिळविण्यासाठी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी ९ मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले असल्याचे स्पष्ट केले.
चौधरी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित ठिकाणी झालेल्या बेकायदेशीर व अतिरिक्त बांधकामाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच गाळा क्रमांक एम.आय.जी. ६४ व गाळा क्रमांक २२ संदर्भातील अतिक्रमण प्रकरणाची सखोल चौकशी करून नियमबाह्य बांधकाम असल्यास ते तात्काळ हटविण्यात यावे.
याशिवाय काही व्यक्तींनी सातत्याने खोट्या तक्रारी करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करत अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या अर्जावर करण्यात आलेल्या कथित खोट्या सही प्रकरणाची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.
तसेच प्राधिकरणाने संबंधित तिघांचे अतिक्रमण एकत्रित हटविण्याचे आदेश दिले असल्यास एकतर्फी कारवाई न करता सर्वांवर समान व निष्पक्ष कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करून न्याय द्यावा, अन्यथा आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशाराही चौधरी यांनी दिला आहे. या उपोषणामुळे प्रशासन आणि स्थानिक पातळीवर या प्रकरणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments