महिलांनी पैशांवरही हक्काने बोलावे; वित्तीय साक्षरतेशिवाय सशक्तीकरण अपूर्ण – मीनाक्षी सिकची
अमरावती प्रतिनिधी : अनिता यादव
अमरावती – महिला सशक्तीकरणाची चर्चा केवळ सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रापुरती मर्यादित न ठेवता आर्थिक क्षेत्रातही महिलांनी सक्षम होणे गरजेचे आहे. वित्तीय साक्षरता आणि योग्य गुंतवणुकीचे ज्ञान महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकते, असे प्रतिपादन वित्त व निवेश सलाहकार मीनाक्षी सिकची यांनी केले.
जी एच रायसोनी विश्वविद्यालय (जीएचआरयू), अमरावती येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘सशक्त महिला, सशक्त भविष्य’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वविद्यालयाचे कुलपति डॉ. विनायक देशपांडे होते. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रशांत अवचट, कार्यक्रम समन्वयक डॉ. स्वाती आंबडकर, डॉ. भावना कारेमोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सिकची यांनी सांगितले की, भारतातील अनेक कुटुंबांमध्ये घरगुती अर्थसंकल्पाची जबाबदारी महिलांवर असते. मात्र बचत, गुंतवणूक आणि दीर्घकालीन वित्तीय नियोजनाबाबत पुरेशी माहिती नसल्याने त्या पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहतात. परिणामी आपत्कालीन परिस्थितीत आर्थिक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे महिलांमध्ये वित्तीय व्यवस्थापन, बचत आणि गुंतवणुकीबाबत जागरूकता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनायक देशपांडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, केंद्र व राज्य शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. महिलांना वित्तीय ज्ञान मिळाल्यास त्या या योजनांचा अधिक प्रभावीपणे लाभ घेऊ शकतील. यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेलाही बळ मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता स्नेहल डोंगरे यांनी केले.
महिला दिनानिमित्त रंगला सांस्कृतिक जल्लोष
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विश्वविद्यालयातील महिला प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गायन, अभिनय तसेच विविध खेळांमधून महिलांनी आपली कला सादर करत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. कार्यक्रमामुळे महिला दिनाचा आनंद द्विगुणित झाल्याचे उपस्थितांनी व्यक्त केले.
0 Comments