Ticker

6/recent/ticker-posts

कोरोना संकटातून उभा राहिलेला आधार: एकल महिलांसाठी अश्विनीताई अवताडे यांचा संघर्षमय प्रवास


मंगरूळपीर प्रतिनिधी कोरोना काळाने अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. अनेक महिला अल्पवयात विधवा झाल्या, तर अनेक मुलांच्या शिक्षण-संस्काराचा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी मंगरूळपीर येथील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनीताई राम अवताडे यांनी एकल महिला, भटक्या समाजातील कुटुंबे आणि अनाथ मुलांसाठी आशेचा किरण ठरत व्यापक सामाजिक कार्य उभारले आहे.

जिव्हाळा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत असलेल्या अवताडे यांनी कोरोना काळात विधवा, घटस्फोटित व परित्यक्ता महिलांच्या समस्या जवळून जाणून घेत त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. मुलांचे समुपदेशन, त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि कुटुंबांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.

या कामादरम्यान त्यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्याशी झाली आणि त्यानंतर महाराष्ट्र साहू एकल समितीच्या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात एकल महिलांसाठी व्यापक काम सुरू झाले. त्यांच्या कार्याची दखल घेत शासनाच्या वात्सल्य समितीवर त्यांची निवड झाली. या समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विधवा, घटस्फोटित व परित्यक्ता महिलांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

अनेक महिलांना संजय गांधी निराधार योजना तसेच एकल बालकांसाठी असलेल्या बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला. याशिवाय महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन लघुउद्योग सुरू करण्यासाठी कर्ज मिळवून देण्याचे कामही केले जात आहे. त्यामुळे अनेक महिलांना स्वावलंबी होण्याचा मार्ग मिळाला आहे.

भटक्या व वंचित समाजातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी अवताडे विशेष प्रयत्न करत आहेत. या समाजातील काही युवक व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडल्याचे लक्षात येताच त्यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना व्यसनमुक्त करण्याचा उपक्रम सुरू केला. तसेच या समाजात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या


  बालविवाहाविरोधात जनजागृती करून अनेक बालविवाह थांबविण्यात यश मिळवले आहे.

कोरोना काळानंतर बंद पडलेल्या वात्सल्य समित्या पुन्हा कार्यान्वित करण्यासाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शासनाचा आदेश असूनही समित्या स्थापन होत नसल्याने त्यांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये तहसीलदार व महिला-बालविकास अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदने दिली. या प्रयत्नांमुळे अखेर वाशिम जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये वात्सल्य समित्या स्थापन झाल्या असून मंगरूळपीरची समिती सर्वप्रथम सक्रिय झाली.

एकल महिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी सर्वेक्षणाची गरज त्यांनी सातत्याने मांडली. त्यानुसार मंगरूळपीर तालुक्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ग्रामीण भागात सुमारे ६४०० एकल महिला आढळून आल्या आहेत. या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच रोजगार कार्यशाळा आयोजित करण्याचा प्रस्ताव समितीसमोर मांडण्यात आला आहे.

तसेच प्रत्येक गाव व शहरी भागात एकल महिलांची स्थानिक कार्यकारिणी तयार करून त्यांना संघटित करण्याचे कामही सुरू आहे. या माध्यमातून महिलांना नेतृत्वाची संधी मिळत असून त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.


कोरोना काळात सुरू झालेली ही चळवळ आता एकल महिलांच्या सशक्तीकरणाचा मजबूत आधार बनत असल्याचे चित्र मंगरूळपीर व वाशिम जिल्ह्यात दिसून येत आहे. अश्विनीताई अवताडे यांच्या कार्यामुळे अनेक महिलांना नव्या आयुष्याची दिशा मिळत असल्याची भावना लाभार्थी महिलांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments