शिक्षकाने केल्याचा आरोप; प्रकरण एसीबी व शिक्षणमंत्र्यांपर्यंत नेण्याचा इशारा
वाशिम :
वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभाग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. विद्यमान माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांनी एका शिक्षकाला शिफारस पत्र देण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप समोर आला असून, यासंदर्भातील एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील एका शिक्षकाला शिफारस पत्राची आवश्यकता असल्याने त्यांनी सुमारे चार ते साडेचार महिन्यांपूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात संबंधित फाईल सादर केली होती. मात्र, या प्रकरणात सतत टाळाटाळ होत असल्याचा अनुभव त्या शिक्षकाला आला. दरम्यान, शिफारस पत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप पुढे आला आहे. या संदर्भातील एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागात चर्चांना उधाण आले आहे.
या प्रकाराची गंभीर दखल अमरावती विभागातील शिक्षक नेत्या डॉ. संगीता शिंदे (बोंडे) यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित शिक्षकाने त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी मंगला धुपे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून या प्रकरणाबाबत जाब विचारल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात पुढील टप्प्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करण्याची तयारी सुरू असून, आवश्यक असल्यास राज्याच्या शिक्षणमंत्र्यांपर्यंतही हा विषय पोहोचवण्याचा इशारा देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभाग मागील काही वर्षांपासून विविध वादांमुळे चर्चेत राहिला आहे. या नव्या आरोपामुळे पुन्हा एकदा विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments